संविधान संपले तर बहुजनांच्या पिढ्या बरबाद होतील : उभाडे

0
14

अर्जुनी मोरगाव,दि.05 : या देशातील थोर महापुरुषांनी भारतात समता स्वातंत्र्य व बंधुभाव बहुजनांमध्ये निर्माण केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीतील अधिकार व कर्तव्य बहाल केले. देशातील बहुजन मागासवर्गीयांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकरांचा संघर्ष सर्व जाती धर्मासाठी समान न्यायाचे व महिलांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी होता. भारतीय बहुजनांनी शत्रू आणि मित्रांमधील फरक ओळखणे सध्या गरजेचे आहे. संविधानाने आम्हा बहुजनांना दिलेले अधिकार आम्हाला समजले नाही आणि संविधान कमकुवत करून संपविले तर बहुजन मागासवर्गीयांच्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाच्या राष्ट्रीय प्रचारक प्रतिभा उभाडे यांनी केले. .

अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी मोरगाव, बाराभाटी व बोंडगावदेवी येथे आयोजित बहुजन क्रांती मोर्चानिमित्त काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेनिमित्त रमाई चौक बोंडगावदेवी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. सभेला राष्ट्रीय मुस्लीम बहुजन क्रांती मोर्चाचे गोंदिया जिल्हा प्रमख जुबीन भाई, प्रा. मनोज लोहे, डॉ. श्यामकांत नेवारे, तुळशीदास बोरकर, अमर ठवरे, गणवीर, भाग्यवान फुल्लुके, अशोक रामटेके, बोरकर, संतोष टेंभुर्णे, पुंडलीक भैसारे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम माता रमाई, आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिभा उभाडे म्हणाल्या, भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष झाली. मात्र, भारतीय संविधानाने मागासगवर्गीयांना दिलेले अधिकार व कर्तव्य आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी बहुजनांना कळूच दिले नाही. भारतीय स्वातंत्र्य व संविधानाचे खरे सुख आम्हा बहुजनांना अद्यापही भोगता आले नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात टीव्ही चॅनेल व वर्तमानपत्रात आपल्या बहुजन विकासाची चर्चा केली जात नाही. बहुजनांचे दु:ख कधी दाखविल्या जात नाही. त्यामुळे पिचलेल्या पीडित आदिवासी अनु. जाती, जमाती व सर्व ओबीसी वर्गांना एकत्रित आणून संविधानाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने हे कार्य सुरू असल्याचे प्रतिभा उभाडे यांनी सांगितले. संचालन व आभार भाग्यवान फुल्लुके यांनी मानले. सभेला मोठ्या संख्येनी महिला-पुरुष उपस्थित होते. .