एसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा

0
8

नागपूर,दि.05 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे संपूर्ण राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या पोलिस अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे नागपूर विभाग एसीबीचा पदभार आहे. एसीबी विभागातच पीडित महिला कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी महिला शिपायाला कॅबिनमध्ये बोलावून तिचा मोबाईल क्रमांक पाटील यांनी घेतला. त्यानंतर वेळीअवेळी तिला फोन करणे सुरू केले. तसेच व्हॉट्‌सऍपवरून सुरुवातीला प्रेमाचे संदेश; नंतर अश्‍लील संदेश पाठवित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांनी तिला व्हॉट्‌सऍपवरून शारीरिक सुखाची मागणी केली. तिने प्रतिउत्तरात मॅसेज टाकून नकार दिला. तसेच यानंतर अशी मागणी न करण्याची समज दिली. त्यामुळे चिडून पाटील यांनी तिला कॅबिनमध्ये बोलावून आमिष दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार असह्य झाल्यामुळे महिलेने मुंबईतील पोलिस महासंचालक कार्यालयात (एसीबी) लेखी तक्रार केली. चौकशीअंती एसीबीच्या अधिकाऱ्यांना कलम 354 चा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.