छत्तीसगडात भाजपचा धुव्वा,मध्यप्रदेश,राजस्थानात काँग्रेस

0
20

गोंदिया,दि.११- मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या २३० जागांच्या कलापैकी भाजपला १०४ जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस ११७ जागांवर आघाडीवर आहे.बसपासह इतर ९ जागांवर आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशमध्ये बहुमतासाठी ११६ जागांची गरज असून, दोन्ही पक्षाची आघाडी पाहता छोटे पक्ष व अपक्षांना मोठे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे दिसते.
गेल्या १५ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे.भाजपला बहुमत न मिळाल्याने शिवराजच्या सासुरवाडी गोंदियातही अनुत्साह होता.दुसरीकडे छत्तीसगडचे मंत्री बृजभुषण अग्रवाल यांचीही सासुरवाडी गोंदिया मात्र छत्तीसगडमध्ये भाजपला बसलेल्या पराभवाचा धक्का त्यांच्या सासुरवाडीतही होता.
छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. छत्तीसगढमध्ये १५ वर्षानंतर काँग्रेस सत्तेत परतली आहे. विधानसभेच्या सर्व ९० जागांचे निकाल आले असून, काँग्रेसने ६४ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ १८ जागांवर यश मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगढ पक्षाला ५ जागांवर समाधान मानावे लागले. मायावती यांच्या बसपाने ३ जागा जिंकल्या.
छत्तीसगढ राज्य बनल्यानंतर आतापर्यंत चार विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर प्रथमच काँग्रेसचा निर्वाचित मुख्यमंत्री बनणार आहे. छत्तीसगढ राज्य निर्माण झाल्यानंतर डॉ. अजित जोगी काँग्रेसचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यांनी नंतर काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर सलग तीन टर्म निवडणुका जिंकत भाजपचे डॉ. रमणसिंग मुख्यमंत्री बनले. काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेला मुख्यमंत्री आता प्रथमच बनणार आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. विधानसभेतील सर्व १९९ जागांचे कल हाती आली असून, काँग्रेसने १०३ जागांच्या आघाडीसह बहुमतांकडे वाटचाल सुरू केली आहे. भाजपला ६८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर अपक्ष व इतर छोटे पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, काँग्रेस विधीमंडळ नेत्याच्या निवडीसाठी बुधवारी जयपूरमध्ये बैठक आयोजित केली आहे. यात मुख्यमंत्रीपदाचा नेता निश्चित केला जाईल.
महत्त्वाचे निकाल
– मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे झालरापाटन मतदारसंघामधून विजयी.
– काँग्रेस नेते अशोक गहलोत सरदारपुरा मतदारसंघातून विजयी
– सचिन पायलट टोंक मतदारसंघातून विजयी
– काँग्रेस नेते सीपी जोशी नाथद्वारा मतदारसंघातून विजयी
– गिरीजा व्यास उदयपूरमधून विजयी
– भाजपचे गुलाब चंद्र कटारिया उदयपूर शहरमधून पराभूत
– मुख्यमंत्री रमण सिंग राजनांदगाव मतदारसंघातून विजयी
– माजी मुख्यमंत्री अजित जोगी मरवाही मतदारसंघातून विजयी