मायावतींचा काँग्रसेला राजस्थान व मध्यप्रदेशात पाठिंबा

0
6

नवी दिल्ली,दि.12(वृत्तसंस्था)- राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत काँग्रेस पक्षाला बसपा सुप्रिमो मायावतींनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा दोन्ही राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून, बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन हात दूर आहे. बसपाच्याही दोन जागा मध्य प्रदेशात निवडून आल्या आहेत. मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसला बहुमताएवढे संख्याबळ प्राप्त झाले आहे.
मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. तर मायावतींच्या बसपाला 6 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्यावर काँग्रेसही राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करू शकणार आहे. राजस्थानात बहुमतासाठी 100 जागांची आवश्यकता असून, मायावती आणि काँग्रेसच्या जागांची संख्या 105 होते आहे. त्यामुळे साहजिकच या राज्यातही काँग्रेसचंच सरकार येणार आहे.