महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विषयात उज्ज्वला योजनेमुळे परिवर्तन – केंद्रिय पेट्रोलियम मंत्री प्रधान

0
17

मुंबई.दि.12 – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने ‘ग्रामीण जीवनात उज्ज्वला योजनेचे योगदान : वंचितावस्थेतून विकासाकडे’ या विषयावर नुकतीच एक दिवसीय परिषद योजण्यात आली होती. देशाच्या विविध राज्यातून व प्रामुख्याने महाराष्ट्रातून मिळून सुमारे 400 उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला या परिषदेत सहभागी झाल्या होत्या. केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिषदेचे उद्घाटन केले तर अध्यक्षपदी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे होते.
यावेळी प्रधान म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणून भारताच्या काना – कोपऱ्यातील गरीब आणि वंचित परिवारातील महिलांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे ध्येय ठेवले. आज या महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक विषयात परिवर्तन होऊ लागले आहे, महिला सक्षमीकरणाला यातून सुरुवातही होत आहे. प्रारंभी पेट्रोलियम मंत्रालयाने 5 कोटी परिवारापर्यंत पोहोचण्याचे उदिष्ट ठेवले होते जे आज 8 कोटी परिवारांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत 6 कोटी परिवारापर्यंत ही योजना पोहोचवण्यात पेट्रोलियम मंत्रालयाला यश मिळाले आहे. येणाऱ्या काही काळात राहिलेल्या 2 कोटी परिवारांपर्यंत ही योजना आम्ही नेऊ असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी दिला. प्रबोधिनीच्यावतीने या योजनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रकाशित केला. प्रबोधिनीच्या कार्यनिष्ठेचा गौरव करतानाच या सर्वेक्षणातून योजनेसंदर्भात आलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. देशाच्या विविध राज्यातून आलेल्या लाभार्थी महिला, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी व ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केलेले विविध क्षेत्रातील प्रतिनिधी या दिवसभर झालेल्या परिषदेत उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, विशेष पाहुणे म्हणून तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, व्यवस्थापन समिती सदस्या रेखा महाजन प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे व कार्यकारी प्रमुख रवी पोखरणा या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.