आरपीएफने पकडला पाच लाखाचा हुक्का तंबाखू

0
22

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने एसएलआर कोचमध्ये चुकीची माहिती देऊन आणण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा सुगंधित विदेशी तंबाखु जप्त केल्याची घटना बुधवारी घडली.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गठित केलेल्या स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमचे सदस्य केदार सिंह, रजन लाल गुर्जर यांना रेल्वेतून मादक पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यांनतरं तपास सुरु केला असता सकाळी ७ वाजता पार्सल कार्यालयासमोर ६ पार्सल संशयास्पद स्थितीत ठेवलेले आढळले. आजूबाजूला विचारणा केली असता मोहम्मद रजा अब्दुल अजीज मदारने हे पार्सल नेण्यासाठी आला असल्याचे सांगितले. पार्सलमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने पार्सल सुरज नावाच्या पार्टीचे असून त्यात काय आहे याची माहिती नसल्याचे सांगितले. पार्सलमध्ये मादक पदार्थ असल्याची शंका आल्यामुळे आरपीएफ जवानांनी त्वरित याची सूचना निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना दिली. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक राजेश औतकर हे पार्सल कार्यालयात पोहोचले. त्यांनी मदारची चौकशी केली असता त्याने रेल्वेने दिलेली रसीद दाखविली. पार्सल क्लर्कने रसीद तपासून त्यात २३ पार्सल असल्याचे स्पष्ट झाले. यात सहा पार्सल संशयित आढळले. या सामानाची माहिती रसीदमध्ये नव्हती. संशय वाढल्यामुळे वाणिज्य विभाग आणि सुरज पार्टीच्या प्रतिनिधीसमोर सहा पार्सल उघडण्यात आले. यात चुकीची माहिती देऊन बुक करण्यात आलेला विदेशी तंबाखू जप्त करण्यात आला. निरीक्षक वानखेडे यांच्या आदेशावरुन संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक माहिती घेण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केलेल्या पार्सलपैकी पहिल्या पार्सलमध्ये रशियन माफिया, समर ६९ आणि जुमा ब्ल्यूबेरी लिहिलेले युएईच्या सुगंधित तंबाखूचे ७२० पाकीट, दुसऱ्या पार्सलमध्ये तीन मोठ्या पाकिटात ‘हुक्का अ‍ॅसेसरीज’चे ६०० पाकीट आणि चार पार्सलमध्ये मेड इन युएई लिहिलेले २४ पाकिटात फल फखेर लिहिलेले तंबाखूची २८८० पाकिटासह ५ लाख ७ हजाराचा माल जप्त करण्यात आला.
बुटाच्या बॉक्समध्ये लपवून रेल्वेगाडीने दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी रंगेहात अटक करून त्याच्याकडून १०४० रुपये किमतीच्या दारूच्या ४० बॉटल्स जप्त केल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, संतोष पटेल यांनी ही कारवाई केली. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चमूसोबत गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दलाला प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक व्यक्ती बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळला. चौकशीत त्याने आपले नाव प्रवीण संभाजी पेटकर (३०) रा. हिंगणघाट असे सांगितले. संशयाच्या आधारे त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात बुटाचे दोन बॉक्स आढळले. हे बॉक्स लपविण्याचा प्रयत्न आरोपी करीत होता. आरपीएफ जवानांना शंका आल्यामुळे त्यांनी हे बॉक्स उघडले असता त्यात देशीदारूच्या ४० बॉटल्स आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी आरोपीस मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केले.