अवैध मांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
12

नागपूर,दि.14 : म्हाळगी नगरासह विविध भागात अवैधपणे मांस विक्री करणाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारसा दिले.विक्रेत्यांना म्हाळगी नगरात स्थायी गाळे देण्यात आले आहे. परंतु गाळ्यात न बसता इतरत्र मांस विक्री करुन उरलेले मांस परिसरात टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरत असल्याच्या जनतेच्या तक्रारींची दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्यात.रविभवन येथे  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
म्हाळगी नगर येथील सत्यम प्लाझा बिल्डिंग मधील तळमजल्यावरील हॉटेलमधील सांडपाणी तसेच मांस विक्रेत्यांची समस्या नागरिकांना भेडसावत असल्याचे आमदार सुधाकर कोहळे यांनी यावेळी सांगितले. म्हाळगी नगर, तुकडोजी महाराज पुतळा चौक, मानेवाडा परिसर, उदय नगर चौक या भागातील मांस विक्रेत्यांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने गाळे देण्यात आले असताना देखील संबंधित विक्रेता रस्त्यावर मांस विक्री करीत आहे. सायंकाळी उरलेले मांस इतरत्र फेकल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
बैठकीत मिहान पूनर्वसन मालकी हक्काचे कायमस्वरुपी पट्टे मिळण्याबाबत, परसोडी झोपडपट्टीवासियांना पट्टे मिळण्याबाबत, रनाळा गावात देण्यात आलेल्या बांधकामासंबंधी नोटीस, कामठी तालुक्यातील विविध विषयावर चर्चा करुन नागरिकांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, मल्लिकार्जून रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.