मग्रारोहयोच्या कॅटलशेडचा पैसा न मिळाल्याने लाभार्थ्याचा मृत्यू

0
8

आमगाव,दि.14ः- आमगाव पंचायत समितींतर्गत येत असलेल्या खुर्शीपार येथील एका महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थी शेतकर्याला प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सहन करीत आपले प्राण गमावावे लागले मात्र मग्रारोहयो योजनेतील कॅटलशेडचा पैसा मात्र मिळाला नाही.तालुक्यातील खुर्शीपार येथील उरकुडा ठाकुर यांना मग्रारोहयोंतर्गत कॅटल शेड मंजूर झाले होते.त्यानुसार त्यांनी मंजूर कोठ्याचे बांधकामही पूर्ण केले.आणि बांधकाम झालेल्या बिलासाठी पायपीट सुरु केली.त्यातच त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि ते आजारी पडले.कोट्याच्या बांधकामासाठी घऱी असलेला पैसा आधीच खर्च झाल्याने उपचारासाठी ठाकूर यांच्या कुटूबियांकडे पैसा उपलब्ध नव्हता त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी लागणारा पैसा नसल्याने उरकुडा ठाकूर यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला.विशेष म्हणजे त्या कोट्याच्या बांधकामाचे बिल निघावे यासाठी मग्रारोहयोअंतर्गत कार्यरत कंत्राटी अभियंता वंजारी यांना त्यांनी काही पैसेही दिले होते.परंतु पैसे देऊनही वंजारी यांनी बांधकामाचे देयके काढण्यास हयगय केली आणि उपचारासाठी बांधकाम पुर्ण झालेल्या योजनेचे पैसे न मिळाल्याने उपचार होऊ शकले नसल्याची खंत उरकू़डा ठाकूर यांच्या कुटूबियांनी करीत वंजारीसह देयके काढण्यास उशीर कऱणार्या संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.