शेतकरी पुन्हा आक्रमक होणार…

0
7
# शेतकरी आत्महत्या व दुष्काळप्रश्नी किसान सभा केंद्रीय स्तरावरून लक्ष वेधणार !

मुंबई (शाहरुख मुलाणी)दि.15 –  सातत्याची नापिकी, तीव्र दुष्काळ, फसवी कर्जमाफी, पीक विमा फसवणूक व बोंड आळी नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात आल्याने राज्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या विशेष करून वाढल्या आहेत. अमरावती महसूल विभागातील पाच जिल्हे व विदर्भातील वर्धा जिल्हा मिळून तब्बल १०२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडे समोर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व खानदेशातही आत्महत्यांचे आकडे वाढत आहेत. एका बाजूला कर्जमाफी, हमी भाव व नुकसान भरपाईच्या फसव्या घोषणा व दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट क्षेत्राच्या सोयींसाठी बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गावर कोट्यवधीच्या निधीचा चुराडा अशा धोरणांमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ होत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान शेतकरी आत्महत्या व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता तरी आपले विदेश दौरे थांबावेत. आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्याचा दौरा तातडीने आयोजित करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलावीत. आत्महत्या थांबविण्यासाठी आत्महत्याग्रस्त विभागाला विशेष मदतीची घोषणा करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करत आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी किसान सभेच्या वतीने आत्महत्याग्रस्त विभागात तातडीने जागृती अभियान सुरू करण्यात येत आहे. दिनांक १६ डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, उपाध्यक्ष यशवंत झाडे पवनार पासून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. आत्महत्याग्रस्त विभागांना केंद्र सरकारने तातडीने विशेष मदत करावी यासाठी केंद्रीय स्तरावर हस्तक्षेप करण्याबाबत या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या व राज्यातील गंभीर दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची बैठक दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होत आहे. महाराष्ट्रातून किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय किसान कमिटी सदस्य किसन गुजर व डॉ. अजित नवले या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.