२२ व २३ डिसेंबर रोजी वाशिम येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव’

0
24

वाशिम, दि. १५ : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांना जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

ग्रंथोत्सवानिमित्त २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार विजयराव जाधव, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व्य. रा. बावणे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह पालकमंत्री मदन येरावार राहतील. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सायंकाळी ६ वाजता हास्यकवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा हास्यविनोद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘ग्रंथ वाचन आणि विकास’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक मोहन शिरसाट, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी शेख युसुफ सहभागी होतील.

दुपारी ३ वाजता ‘वाह वाह क्या बात’ फेम  हास्यकवी मनोज मद्रासी यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम होईल. यामध्ये प्रा. फारुख जमन व डॉ. विजय काळे सहभागी होतील. सायंकाळी ४ वाजता ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे असतील. अमरावतीचे सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अप्पर कोषागार अधिकारी एस. टी. गाभणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड यांनी दिली आहे.