मुख्य वनसंरक्षकांची फसवणूक

0
8

नागपूर,दि.15 : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. त्यांच्याकडील डेबिट कार्डची माहिती घेऊन खात्यातून पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले.
मंगळवारी बाजार, स्टारकी टाउन रहिवासी डॉ. श्रवन श्रीवास्तव (59) हे कार्य आयोजन विभागाचे मुख्य वनसंरक्षकपदावर कार्यरत आहेत. 4 डिसेंबर रोजी रविनगरातील वनविभागाच्या कार्यालयातील आपल्या कक्षात हजर असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. वेगवेगळ्या तीनजणांनी फोन करून ते बॅंकेचे अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडे असलेल्या एसबीआयच्या डेबिट कार्डची मुदत संपत असून नवीन कार्ड तयार करून देणार असल्याची थाप मारून डेबिट कार्डची सविस्तर माहिती घेतली. आरोपींनी त्या आधारे यूपीआय पेऍपद्वारे त्यांच्या खात्यातून 1 लाख 75 हजार रुपये अन्य खात्यांत ऑनलाइन वळते केले. या प्रकरणी डॉ. श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.