यंग मुस्लीम क्लबने जिंकली राज्यस्तरीय शहिद जवान फुटबाॅल स्पर्धा

0
13

पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीग सामना देण्याची ग्वाही , गोंदियातील क्रीडा मैदाने मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळासारखी हवी

गोंदिया,दि.15(खेमेंद्र कटरे)- पराभव हेच भविष्यातील विजयाची चाबी असून हे स्विकारून खेळभावनेने खेळलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पोलीस विभागाने राज्यस्तरीय शहिद जवान फुटबाॅल स्पर्धा घेऊन गोंदियाला नावलौकिक मिळवून दिले.सोबतच आरोग्याला लाभदायक असलेल्या प्रत्येक स्पर्धांचे आयोजन करून पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी चांगल्या कार्याची सुरवात करीत गोंदियात स्पोर्टिग क्लचरला चालना दिल्याबद्दल अभिनंदन केले.तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी हा मैदान हिरवेगार करून द्या मी राष्ट्रीय नाही तर अंतरराष्ट्रीयस्तराचा एक लीग सामना या ठिकाणी घेण्याची जबाबदारी स्विकारतो असे म्हणत गोंदियाला फुटबाॅलच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही देत शिस्तीने काम करणार्या पोलीसासोबतच शहिद जवानांचे बलीदान विसरता येणारे नसल्याचे विचार व्यक्त केले.

ते गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे आयोजित राज्यस्तरीय शहिद जवान फुटबाॅल स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे बक्षिस वितरक म्हणून बोलत होते.या स्पर्धेच्या समारोप व बक्षिस वितरण सोहळ्याला राज्यसभा सदस्य व अखिल भारतीय फुटबॉल संघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल,आमदार गोपालदास अग्रवास,पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,पोलीस अधिक्षक हरिष बैजल,अति.पोलीस अधिक्षक संदिप आटोळे,गोंदिया जिल्हा फुटबाॅल संघाचे पदाधिकारी व शहिद जवानांचे कुटूबिंय उपस्थित होते.सुरवातीला पाहुण्याचे स्वागत पुष्पगृच्छ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले.

बक्षिस वितरण सामन्यापुर्वी स्पर्धेचा अंतिम सामना यंग मुस्लीम क्लब नागपूर विरूध्द राहूल फुटबाॅल क्लब नागपूर यांच्यात चांगलाच रमला.यामध्ये सामन्याच्या मध्यान्यपुर्वी यंग मुस्लीम क्लब नागपूरने 1-0 अशी आघाडी घेत खेळावर आपली पकड घट्ट करीत विजय संपादन केला.राहूल क्लबच्या खेळाडूंनी अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न केला,परंतु बालकिपरच्या उत्कृष्ठ कामगिरीने राहूल फुटबाॅल क्लबला गोल करता आले नाही.हा सामना एवढा चुरसीचा झाला की प्रेक्षकांनी तीन दशकानंतर फुटबाॅलच्या सामन्याचा खरा आस्वाद घेतल्याचे चित्र बघावयास मिळाले.खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर प्रेक्षकांनी त्यांना दाद देत प्रोत्साहित केले.क्रिकेट व फुटबाॅलच्या राष्ट्रीय सामन्यामध्ये जशी प्रेक्षकांचा जल्लोष असतो तसा जल्लोष आजच्या अंतिम सामन्याच्यावेळी बघावयास मिळाला.विशेष म्हणजे अंतिम सामन्याचा मध्यानानंतरचा पुर्ण खेळ खासदार प्रफुल पटेल यांनी बघितला.यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे,नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनीही विचार व्यक्त केले.

या सामन्याची सुरवात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे,पोलीस अधिक्षक हरीष बैजल,अति.पोलीस अधिक्षक संदिप आटोळे,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,राजीव नवले,सोनाली कदम यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीमती बैजल,पुरोषत्तम मोदी आदींनी केली. दोन्ही संघाच्या खेळाडूनी रोमहर्षक खेळ खेळला प्रेक्षकानी अनेक वर्षानंतर पहिल्या़दा फुटबालचा आनंद घेतला हजारोच्या संख्येत असलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद खेळाडूंना प्रोत्साहित करणारा होता.दोन्ही संघाच्या बालकिपरने गोल थांबवून सामन्यात चुरस निर्माण केली होती.पहिला हापच्या १० मिनिटापुर्वी पहिला गोल यंग मुस्लीमने करून आघाडी घेतली.पहिल्या हापनंतर गुरुनानक शाळा गोंदियाच्या विद्यार्थ्यांनी भांगडा नृत्य सादर करुन मंत्रमुग्ध केले.राज्यस्तरिय शहिद जवान फुटबॉल स्पर्धेत तिसरा स्थान बाम्बे इंजिनियरिंग गृप एफसी पुणे संघाने नागपूर फुटबाल अकादमीचा पराभव करीत पटकावला.या सामन्यानंतर नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीत सादर केले.

समारोपीय स्पर्धेचे प्रास्तविक करतांना पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी स्पर्धेसाठी ५ लाख रुपयाचा स्थानिक विकास निधी लोकप्रतिनिधीकडून मिळाल्याचे सांगत गोंदिया जिल्हा फुटबाल संघ,व्यापारीवर्गासह इतरांनीही स्वयंस्पुर्तींने सहकार्य केल्यामुळे ही स्पर्धा होऊ शकल्याचे सांगत पुढच्यावर्षी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला.सोबतच आपल्या पोलीस विभागातील खेळाडू असलेले मार्टिन यांचा विशेष उल्लेख करीत त्यांच्या काही कल्पना व फुटबाॅलबद्दलची दिलेल्या माहितीमूळे ही स्पर्धा घेण्याचा विचार आला आणि तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्याचे सांगितले.स्पर्धेचा समारोपीय आभार देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मानले.पोलीस विभागाचे सर्व अधिकारी,कर्मचारी,गोंदियातील सर्व फुटबाॅल क्लबचे पदाधिकारी यांनी यास्पर्धेसाठी परिश्रम घेतले.तर स्पर्धेच्या पहिल्यादिवसापासून शिव नागपूरे,राजेश शेंद्रे यांनी काॅमेंट्री बाॅक्स सांभाळून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.