मांडोदेवीच्या जंगलात सापडले दोन मृतदेह

0
13
विवाहितेची गळा चिरून हत्या, तरूणाचा गळफास
आमगाव,दि.15- तालुक्यातील बघेडा येथील सुर्यादेव मांडोदेवी परिसरातील हरदोली मार्गावर देवस्थानापासून अर्धा किलोमिटर अंतरावर विवाहित महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी(दि.१४) सायंकाळच्या सुमारास आढळून आला. त्या प्रकरणाचा तपास करण्याकरिता आज(दि.१५) आमगाव पोलिस जंगलात गेले असता मांडोदेवी ते तेढा या मार्गावर मांडोदेवी देवस्थानापासून अर्धा किलोमिटर अंतरावर झाडाला गळफास घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय? याचा पोलिस शोध घेत आहेत.  शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मांडोदेवी ते हरदोली मार्गावर रस्त्याच्या कडेला सालेकसा तालुक्यातील सालईटोला बापूटोला येथील काजल इंद्रराज राऊत (वय २२) या विवाहितेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती आमगाव आणि सालेकसा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपासणी केली. परंतु, ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला. ते आमगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने आमगाव पोलिसांनी प्रकरण आपल्या हाती घेतले. सायंकाळ झाल्याने पोलिस परतले. आज शनिवारला(दि.१५) सकाळी पोलिस मांडोदेवीच्या जंगलात गेले असता आमगाव पोलिसांच्या हद्दीतच तेढा मार्गावर रस्त्याच्या कडेला जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. तो तरूण सडक अर्जुनी तालुक्यातील जांभडी या गावातील आहे. ज्याठिकाणी हा मृतदेह आढळला. त्याठिकाणी जमीनीवर मा ठार जयभीम असे मातीत कोरून ठेवले आहे.त्या तरूणाचे नाव विलास शामराव कोचे (वय २५ रा. जांभळी दोडके) असे आहे. या दोन्ही घटना एक किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. विलास हैदराबाद येथे कामाला होता. तो आता गावाकडे आला होता. तो मुलीच्या नात्यातील असल्याची चर्चा आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहेत काय याचा तपास पोलिस करत आहेत. तरूणाची हत्या की आत्महत्या या दृष्टीने देखील आमगाव पोलिस तपास करत आहेत.
शुक्रवारी जंगलात रक्ताने माखलेल्या आणि मृतावस्थेत आढळून आलेल्या तरूणीचे लग्न गोरेगाव येथील युवकाशी गतवर्षी उन्हाळ्यात झाले होते. परंतु, तीचे सासरच्यांशी पटत नसल्याने आपल्या माहेरी राहत होती. ती साखरीटोला येथे कम्प्युटरचे प्रशिक्षण घेत होती. दोन दिवसांपासून ती घरून बेपत्ता होती, अशी चर्चा आहे.
देवरी, सालेकसा, आमगाव आणि गोरेगाव अशा चार तालुक्यांच्या सिमेवर सुर्यादेव मांडोदेवी हे देवस्थान आहे. हा परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. दिवसेंदिवस या देवस्थानाची महती वाढत असल्याने येथे भावीक दूरवरून मोठ्या संख्येने येतात. दुसरीकडे हा परिसर जंगलव्याप्त आणि एकांतस्थळी असल्यामुळे आंबटशौकीनांकरिता हा परिसर पहिल्या पसंतीचा ठरत आहे. शाळकरी मुले आणि मुली शाळेला बुट्टी मारून येथे आपल्या सोबत्यांसह येतात. या जंगलात अनेकवेळा हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याच्या आणि आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे हा परिसर क्राईम पॉईंट ठरत आहे.