तुमसरात आज शिक्षण आशय परिषदेचे आयोजन

0
11

तुमसर,दि.16ः- येथील छत्रपती फाऊंडेशन व सत्यशोधक शिक्षक सभा या संघटनांतर्फे तुमसर शहरात ‘शिक्षण आशय परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही एकदिवसीय परिषद आज रविवार, दि. 16 डिसेंबर रोजी होणार असून सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ व विचारवंत डॉ. अनिल सद्गोपाल(भोपाळ) हे या परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्य व देशभरातील अनेक विचारवंत, अभ्यासक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शिक्षणाशी समाजातील प्रत्येकाचा जवळचा संबंध असतो. प्रत्येकाला स्वभिमानी जीवन जगता येईल असे सकस व समान शिक्षण देणे, हे शासनाचे आद्य कर्तव्य असते. भारतीय संविधान सर्वांना दर्जा व संधीची समानता देण्याची हमी देते. ही समानता आणण्यासाठी शिक्षण हेच अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. परंतु आज शिक्षणाचे खाजगीकरण व स्तरीकरण करून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. महागड्या खाजगी शाळांना प्रोत्साहन देत सरकारी, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचा डाव सुरू आहे. अशा परिस्थितीत सजग नागरिकांनी ‘समान शाळांचा’ आग्रह धरला आहे. प्रस्थापित शिक्षणातल्या आशयाची (पाठ्यक्रम, अभ्यासक्रम इ.) सुद्धा चिकित्सा करणे अत्यावश्यक आहे. याकडे बहुसंख्य लोक दुर्लक्ष करीत असतात. शिक्षणातला आशय सकस, उत्पादक व विज्ञाननिष्ठ बनवूनच शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणता येईल, अशी या कार्यक्रमामागील भूमिका आहे.

दि. 16 डिसेंबर रोजी तुमसरातील राजाराम लाॅन्स येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 4.00 या वेळेत ही परिषद होणार असून परिसरातील सर्व शिक्षक, सजग पालक व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सत्यशोधक शिक्षक सभा व छत्रपती फाऊंडेशन ने केले आहे.