रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार- सहकार मंत्री सुभाष देशमुख

0
12

* राज्यस्तरीय महा रेशीम अभियानाचा शुभारंभ
* रेशीम शेतीला विम्याचे संरक्षण
* अहिंसा रेशीम कापडाचे उत्पादनाला सुरुवात
* उत्कृष्ठ रेशीम शेतकऱ्यांचा सन्मान
नागपूर दि. 17 : कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम राबविण्यात येत असून यामाध्यमातून अर्थसहाय्यासह बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे ‘महा रेशीम अभियान २०१९’ चा राज्यस्तरीय शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे, आयकर उपायुक्त संजय धिवरे, बँकेचे प्रतिनिधी सुभाष भेंडे, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत आदी उपस्थित होते.
रेशीम शेतीला अर्थसहाय्य देण्यासंबंधी बोलतांना मंत्री देशमुख म्हणाले, नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच ऊसाप्रमाणे रेशीम शेती करण्यास इच्छूक शेतकऱ्यांना सहकारी संस्था तसेच बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली जाईल. दुसऱ्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी स्वत: सहभाग घ्यावा. रेशीम शेतीचा पीक विमा योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
ऊस हे शाश्वत भाव देणारे पीक असले तरी त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असते. तुलनेत रेशीम शेतीला लागणारा खर्च हा उत्पादनापेक्षा कमी असतो. त्यामुळे रेशीम शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा नफा मिळवतोच.फक्त शेती करुन भागत नाही तर उत्पादित मालाला बाजारपेठ मिळणे गरजेचे असते त्यासाठी रेशीम व हातमाग महामंडळाच्या माध्यमातून रेशीम शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
रेशीमची मागणी जगात वाढत असताना राज्यातील रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण तयार करण्यात आल्याचे सांगताना वस्त्रोद्योग मंत्री पुढे म्हणाले की, अहिंसा रेशीम या नव्या कल्पनेच्या आधारावर उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. या उत्पादनाचा संपूर्ण जगभर प्रसार व प्रचार करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
रेशीम ग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोष ते कापड ही संपूर्ण प्रक्रिया क्लस्टरच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. मिल्क ते सिल्क ही संकल्पना राबवून शेतकऱ्यांनी तुतीला दुधारू जनावरांसाठी चारा म्हणुन वापरावे, असा सल्ला देत रेशीम शेती ही पारंपारिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून मॉडेल ठरेल, अशा पद्धतीने येत्या काळात शासनाला सहकार्य करीत शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्रोत्साहन द्यावे तसेच तरुणांनी शहरीकरणाकडे न वळता रेशीम शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी हातमाग उद्योगाला निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगून येत्या काळात रेशीम उद्योग व हातमाग यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवरून देशपातळीवर विकास साधण्यासाठी विपणन व्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हा रेशीम शेतीचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार शेतकरी रेशीम शेतीकडे वळला पाहिजे याकरिता प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या काळात हातमाग महामंडळाच्या वतीने विपणन व्यवस्थेत सुधार, सहकारी बँकांच्या मदतीने सुक्ष्म सिंचनाला आधार देण्यासह शेतकऱ्यांना सधन बनविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जी. एन. राठोड, ए. पी. मोहिते यांनी केले. यावेळी संचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली चित्रफित दाखविण्यात आली.

उत्कृष्ठ रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान
रेशीम संचालनालयाच्या वतीने महा-रेशीम अभियान २०१९ करिता तयार करण्यात आलेली दिनदर्शिका, सचित्र माहिती पुस्तिका, रेशीम ग्राम मॉडेलसह अहिंसा रेशीम, एमएच डिजीलुम मोबाईल ॲपचे विमोचन करण्यात आले. यावेळी राज्यात रेशीम शेतीच्या माध्यमातून सधन झालेल्या अविनाश वाट, संदीप निखाडे, वामन डहारे, यशवंत ठाकरे, कालीदास बावणे रविंद्र पंडीत, डॉ. संतोष थोटे, विजय पाटील यांच्यासह ३० शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र, शाल व रेशीम माला देऊन सन्मान करण्यात आला.

भंडाऱ्याचा रेशीम रथ ठरला सर्वोत्कृष्ठ
कार्यक्रमाची सुरुवात रेशीम यात्रेने करण्यात आली. वसंतराव देशपांडे सभागृह येथून निघालेली रेशीम यात्रा विविध मार्गावरून क्रमण करीत सभागृहात विसर्जित करण्यात आली. यात्रेमध्ये रेशीम शेतीसह उद्योगाशी संबंधित माहिती पटाचे रथ तयार करण्यात आले. यामध्ये जिल्हा रेशीम कार्यालय भंडाऱ्याचा ऑटोमॅटीक रिलीफ सेंटरवर आधारित रथ सर्वोत्कृष्ठ ठरला. दुसरा क्रमांक औरंगाबाद येथील पैठणी निर्मिती प्रक्रिया उद्योगाशी संबंधी रथाला तर तिसरा क्रमांक वाई येथील रेशीम ग्राम ने पटकावला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतीचिन्ह, देऊन सन्मानित करण्यात आले.
महा रेशीम अभियानासंदर्भात शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने राज्यातील ३२ जिल्ह्यांनी रेशीम रथ तयार केले होते. या प्रचार रथाच्या माध्यमातून रेशीम कोष निर्मितीपासून कापड उत्पादन व विपणन आदींची आकर्षक पद्धतीने माहिती उपलब्ध करुन देण्यात आली होती. वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देखमुख यांनी चित्ररथाची पाहणी करुन राज्यातून आलेल्या शेतकरी व जिल्हा रेशीम अधिकाऱ्यांकडून रेशीम उत्पादनासंदर्भात माहिती घेतली. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील कोषापासून तयार करण्यात येत असलेल्या धागा ते कापड या प्रक्रियेबद्दलही माहिती घेताना टसर उत्पादन राज्याच्या इतर जिल्ह्यातही घेण्याबाबत यावेळी सूचना केल्यात.

रेशीम शो-फॅशन शो चा घेतला आनंद
महा रेशीम अभियान कार्यक्रमात उद्घाटन समारोहानंतर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी रेशीम पासून तयार करण्यात आलेले आकर्षक परिधान धारण करुन तरुणाईने रॅम्प वॉक केला. मान्यवरांनीही रेशीम वस्त्रांचे कौतुक करीत फॅशन शोचा आनंद घेतला.