गावकऱ्यांनी ठोकले डुंडा शाळेला कुलूप

0
5

सडक अर्जुनी,दि.18ः- शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेसाठी कायम शिक्षक देण्यात यावे मागणीला घेऊन गावकºयांनी शाळेला कुलूप ठोकले. ग्राम डुंडा येथे शनिवारी (दि.१५) हा प्रकार घडला असून सोमवारीही (दि.१७) शाळा बंदच होती.

ग्राम डुंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत असून ३९ विद्यार्थी आहेत. शाळेत मुख्याध्यापक के.एम.मेश्राम व एक शिक्षक होते. मात्र मुख्याध्यापक मेश्राम आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याने पालकांनी पंचायत समितीत तक्रार केली होती. खंडविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपसभापतींनी शाळेला भेट दिली मुख्याध्यापक मेश्राम दोषी आढळले होते. यावर त्यांना येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत हलविण्यात आले. तर येथील शाळेतील शिक्षक आर.एच.चौधरी यांना डुंडा येथील शाळेत तात्पुरते जाण्याचे आदेश ३० नोव्हेंबर रोजी देण्यात आले.मात्र येथील शाळेतील मुख्याध्यापक गोपीचंद चौधरी त्यांना सोडत नसल्याने मागील १५ दिवसांपासून डुंडा येथील शाळेतील एकच शिक्षकावर पूर्ण शाळेची जबाबदारी आली आहे. अशात ते ३९ विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिकवित आहेत.
अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांचीही फसगत होत आहे. यावर शाळेला कायम शिक्षक देण्यात यावे यासाठी पालक व गावकऱ्यांनी शनिवारी (दि.१५) शाळेला कुलूप ठोकले. विशेष म्हणजे, सोमवारीही (दि.१७) शाळा बंद होती.
गटशिक्षणाधिकारी एस.आर.बागडे यांनी ३० नोव्हेंबर रोजी पांढरी शाळेतील मुख्याध्यापकांना पत्र देऊन शिक्षक आर.एस.चौधरी यांना डुंंडा शाळेत जाण्यासाठी सोडावे असे कळविले होते. मात्र त्यांनी शिक्षक चौधरी यांना सोडले नसल्याने डुंडा येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. करिता मुख्याध्यापक गोपीचंद चौधरी व शिक्षक चौधरी यांचा पगार कपात करण्यात आल्याचे सांगीतले. तसेच लवकरात लवकर डुंडा शाळेसाठी शिक्षकाची सोय करणार असल्याचे सांगीतले.