सिहोरा-बपेरा परिसरातील वाळू घाटावर वाळूमाफियांचे गुंडाराज

0
17

तुमसर,दि.18 : महसूल मिळविण्यासाठी वाळूघाटांचे लिलाव केले जातात. वाळू उत्खननासाठी लिलावाच्या काही अटी, शर्ती व मर्यादा ठरवून दिल्या जातात. परंतु बहुतांश वाळू घाटांवरून मंजूर मर्यादेपेक्षा जास्त वाळूचे उत्खनन केले जाते. ही बाब तर नित्याचीच झाली आहे. आजच्या घडीला सर्वच वाळू घाट लिलावाअंती मोकळे झाले आहेत. वाळू तस्करांचे प्रमाण व वर्चस्व वाढविण्यात प्रशासनातील भ्रष्टाचार व्यावसायिक निर्णयाचा अभाव हाच खरा कारणीभूत आहे.

मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर आणि भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सर्वच वाळूघाटाच्या लिलावाची मुद्दत संपल्यामुळे सर्वच वाळूघाट मोकाट आहेत. त्यामुळे सिहोरा – बपेरा परिसरातील वाळू तस्करांची दबंग शाही सुरू आहे. बावनथडी नदी पात्रातील वाळूचा उपसा जेसीबी व पोकलँडद्वारे रात्रीच्या वेळी केला जात आहे. नदी पात्रालगत वाळूचे डम्प ठिकठिकाणी दिसत आहेत. सोंड्या सक्करदरा, वारपिंडकेपार, महालगाव व बपेरा येथील वाळूघाट नामांकित आहेत. माडगी देवस्थान सिमेपासून तर सुकळी (नकुल) गावापर्यंत वैनगंगा नदीवर आठ ते दहा वाळूघाट आहेत. यात बाह्मणी, कोष्टी, उमरवाडा, तामसवाडी, रेंगेपार (पांजरा), परसवाडा, मांडवी, देवरी (देव) या घाटांचा समावेश आहे. तर सुकळी (नकुल) व देवरी (देव) हे दोन्ही घाट चोर वाळूघाट म्हणून ओळखले जातात. या घाटांचा कधीच लिलाव होत नसल्याचे वृत्त आहे.डोंगरला, येरली, नवरगाव, कर्कापूर, पांजरा, हरदोली, सोंड्या, सक्करदरा, वारपिंकडेपार, देवरी (देव) आदी ठिकाणी मोठ-मोठे वाळू डम्प आहेत. याकडे महसूल वनविभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रतिप्रश्न आज उपस्थित होत आहे.नदी पात्रालगत शेत जमीन दिवसेंदिवस जेसीबी व पोकलँडच्या वाळू उपसामुळे शेती गिळंकृत होत चाललेली आहे. यात राजकीय पुढारी, पोलीस प्रशासन, वन विभाग व महसूल विभागाचे अधिकारी आज धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसत आहेत. यामुळेच वाळूमाफियांनी उपद्रव माजविला आहे.दरम्यान अधिकाऱ्यांना ट्रक, ट्रॅक्टर ट्राली सापडली तर त्यांना मध्यप्रदेशच्या बालाघाट किंवा रामपायली घाटातील वाळू असल्याचे व शिंगोरी, बुधबुधा किंवा कटंगटोला येथील ट.ीपी.दाखवून वाहने पळविली जातात. म्हणजेच यात राजकीय पुढारी, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी लिप्त असल्याचे वृत्त आहे. कुंपणानेच शेत खाल्ले तर,अशी भूमिका आज दिसत आहे..