पदाच्या दुरुपयोगप्रकरणी सरपंच व उपसरपंच पायउतार

0
38

तुमसर,दि.18 : शासकीय आदेशाला डावलून हेतुपरस्पर पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तुडका ग्रामपंचायतीचे सरपंच तथा उपसरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ग्राम विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यामार्फत करण्यात आली असून तसे आदेश नागपूर विभागीय आयुक्तांना कक्ष अधिकारी विजय लिटे यांच्याकडून मिळालेल्या कार्यालयीन पत्रातून ११ डिसेंबरला दिले गेले आहे. या आदेशामुळे सरपंच मधुकर ढबाले व उपसरपंच उमेश रामलाल थोटे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. अपात्र करण्यात आले आहे. .

तुडका ग्रामपंचायत हद्दीत मोडणारे भूखंड मापन क्रमांक ९२/१, ९३/२ व ९६ ही जमीन महर्षी विद्यालय मंदिर व्यवस्थापनाने शेतकऱ्यांकडून खरेदी केली होती. त्या जमिनीला अकृषक वर्गवारीत मोडण्याकरिता विविध विभागाच्या ना हरकतीकरिता शाळा समितीने अर्ज केले होते. तहसीलदार तुमसर यांच्याकडे महर्षी शाळेने २१ जुलै २०१५ ला नाहरकत प्रमाणपत्राकरिता अर्ज केले होते. त्यात तहसीलदार तुमसर यांनी त्या भूखंडाची वर्गवारी बदलताना शाळा प्रशासनाला इतर शेतकऱ्यांकरिता १२ फुटांचा रस्ता मोकळा सोडून बांधकाम करण्याचे आदेश केले होते. त्याबाबत तत्कालीन तुडका ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी शाळेला रस्ता मोकळा सोडण्याच्या अटीवर शाळा बांधकामास परवानगी दिली होती. मात्र त्या आदेशाची अवहेलना करून महर्षी शाळा प्रशासनाने त्या लगतच्या भागातील मार्गच बंद केला होता. तुडका ग्राम पंचायतीची २७ नोव्हेंबर २०१५ च्या आमसभेत नव्याने पदावर आलेल्या आरोपी सरपंच व उपसरपंचांनी इतर सदस्यांवर दबाव तंत्राचा वापर केला होता. २०१५ सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर बदलेल्या तुडका ग्रामपंचायत सदस्य सरपंच ढबाले व उपसरपंच थोटे यांनी महर्षी शाळेच्या संगनमताने तो मार्ग पूर्णत: बंद केला. त्या गैरप्रकाराबाबत तुडका येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मंगेश अमर मानापुरे, वसंता मानापुरे, गौरीशंकर मानापुरे यांनी तशी रितसर तक्रार सादर केली होती. तुडका ग्रामसभेत हे प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र शाळेने बंद केलेल्या मार्गावर कारवाईकरिता सरपंच व उपसरपंच यांना विनंती केली. कारवाई न करता शाळा बांधकाम योग्य असल्याची संमती दिली होती. .

सदर प्रकरणाव्यतिरिक्त सरपंच ढबाले यांनी उपसरपंच थोटे यांच्या सोबतीने पदावर येताच अचल मालमत्तेवर नवीन कर आकारणी लागू करण्याचे ठरविले. त्यात त्यांनी तुडका गावातील बांधकाम क्षेत्राची मोजणी सुरू केली होती.मूळ दस्ताऐवजाची पळताळणी न करता सरपंचाने गैर न्यायिकपणे अचल मालमत्तेचे गाव नमुने बदलून टाकले. त्याची रितसर तक्रारही सादर करण्यात आली होती. प्रतिवादींनी पदाच्या गैरवापरबाबतचे प्रकरण ग्राम विकास मंत्रालयाच्या न्यायालयीन कक्षात ठेवण्यात आले. त्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) व (३) अन्वये सरपंच ढबाले व उपसरपंच थोटे यांनी दोषी सिद्ध केले. कारवाई स्वरूप त्यांना पदावरून अपात्र करण्याचे आदेश ग्राम विकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी पारीत केले..