अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक

0
13
गोंदिया,दि.18: जिल्हयात अवैध रेती व गौण खनिज उत्खनन तथा अवैध वाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 18 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत सर्व संबंधित विभागांना अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
सदर बैठकीत प्रामुख्याने रेती व इतर गौण खनीजांची अवैध उत्खनन व वाहतूकीवर प्रभावीपणे आळा घालण्यासाठी उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच गोंदिया तालुक्यात कुडवा नाका, बालाघाट रोड टी पाईंट, तिरोडा तालुक्यात नवेगांव आणि सडक अर्जुनी तालुक्यात कोहमारा येथे रेती व गौण खनिज तपासण्यासाठी चेक पोस्ट उभारण्याच्या सूचना सर्व संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. महसूल, पोलिस व परिवहन विभागाने भरारी पथक तयार करुन गौण खनिज चोरीची संभाव्य स्थळे निश्चिीत करुन त्या ठिकाणी धाडी टाकून संबंधितांवर गुन्हा नोंद करुन दंडात्मक कारवाई करण्याच्या निर्देश देण्यात आले.
रेती घाट असलेल्या गावामध्ये, तालुका व उपविभागीय स्तरावर दक्षता समिती तयार करण्यात आली असून सदर समितीच्या सभा दर महिन्याला घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. विविध उपाय योजनेत मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हायातून येणारी अवैध रेती, गौण खनिज रोखण्यासाठी आंतरराज्य सीमेवर असलेले वन विभागाचे चेक पोस्ट रजिस्टरमध्ये रेती वाहतूक होणाऱ्या वाहनांची नोंद होणे आवश्यक असून त्या नोंदी संबंधित तहसिलदारांनी तपासणी करुन दर आठवड्याला अहवाल सादर करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी  दिल्या.
जिल्हयात सन 2018-19 मध्ये दि. 10/12/2018 पर्यंत विविध कारवाई करुन रेती व इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतूकीच्या 138 प्रकरणात रु. 81 लाख 60 हजार वसूली करण्यात आली. तसेच 15 प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात  आले आहे. रेती व इतर गौण खनिजाची अवैध उत्खनन तथा वाहतूक प्रकरणात भरारी पथकाद्वारे सर्व विभागांनी प्रभावीपणे समन्वय साधून कारवाई करुन दर आठवड्याला अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकारी व तससिलदारांना देण्यात आल्या.बैठकीला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, दिनकर ठोसरे पोलिस निरिक्षक(एल.सी.बी.), प्रभाकर पेन्सिलवार सहायक मोटार वाहन निरिक्षक, व भुमि अभिलेख विभागाचे पवार, तसेच उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाधर तळपादे, तहसिलदार तिरोडा संजय रामटेके, अपर तहसिलदार के.डी. मेश्राम, नायब तहसिलदार आर.एम. खोकले व जिल्हा खनिकर्म अधिकारी बी.पी. फुलेकर प्रामुख्याने उपस्थित होते.