शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव

0
16

गडचिरोली,दि.19ः- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृषी व गोंडवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी व सलग्न सेवा तंत्रज्ञानावर आधारीत परिसंवद व चर्चासत्रे हेणार आहेत. तसेच महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री होणार असून गडचिरोली महोत्सव राज्यातील पहिलेच महोत्सव असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कुणाल उंदिरवाडे, जयंत टेंभूर्णे, दीपक सोरते, एच.बी. पंधरे आदी उपस्थित होते.
सदर महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. या महोत्सवाला जिल्ह्यातील १५ हजार शेतकरी भेट देतील, असे नियोजन करण्यात येणार असून त्यांना ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. महोत्सवाला येणार्‍या शेतकर्‍यांची आरोग्य तपासणीकरण्यात येणार आहे. तसेच विविध प्रजातींच्या प्राण्यांचे प्रदर्शन होणार आहे. बचतगटांची १२0 स्टॉल राहणार असून बचतगटांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
या महोत्साचे उद््घाटन २१ डिसेंबर रोजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते राहतील. मार्गदर्शक म्हणून जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, कृषी सभापती नाना नाकाडे, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, सीईओ डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आत्माचे संचालक अनिल बन्सोडे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या महोत्सावादरम्यान कृषीवरील विविध विषयावर व्याख्यान, चर्चासत्र होणार असून सायंकाळी बचतगटांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पवार यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.