समान, मोफत व समतामूलक शिक्षण ही काळाची गरज -डॉ. अनिल सदगोपाल

0
11

तुमसर,दि.19: “भारतातील प्रत्येक नागरिकाला समान, मोफत व समतामूलक शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अनिल सदगोपाल यांनी केले. येथील राजाराम लाॅन्समध्ये छत्रपती फाऊंडेशन व सत्यशोधक शिक्षक सभेतर्फे आयोजित ‘शिक्षण आशय परिषदेत’ उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले “आपले संविधान शिक्षणातून सर्वांगीण समता आणण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु प्रत्यक्ष मात्र गरीब व श्रीमंतांना वेगवेगळे शिक्षण दिले जाते. शिक्षणाचे खाजगीकरण, स्तरीकरण व बाजारीकरण हे घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी आहे. केवळ मतदानाचा हक्क देणे म्हणजे लोकशाही नव्हे. तर शिक्षणाच्या माध्यमातून समान संधी दिली जाणे म्हणजे खर्या लोकशाहीची सुरूवात होईल. ‘समान शाळा’ ‘शेजार शाळा’ या संकल्पना जगातील अनेक राष्ट्रांमध्ये राबविल्या जात आहेत. भारतातील शासन मात्र स्वतःहून समाजाला समान शाळा व्यवस्था भेट देणार नाही. त्यासाठी सामान्य लोकांना जनआंदोलन निर्माण करावे लागेल.”

याप्रसंगी डॉ. नारायण भोसले(मुंबई), डॉ. दिलीप चव्हाण(नांदेड), श्री. हेमंतकुमार(बनारस), प्रभाकर गायकवाड(औरंगाबाद), डॉ. प्रदीप मेश्राम(भंडारा), श्रीकांत काळोखे (अहमदनगर) , रमेश बिजेकर(नागपूर) इत्यादी अभ्यासक कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय शिक्षणातील आशय हा अधिकाधिक वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष व सकस असावा. अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची रचना ही रोजगाराभिमुख, उत्पादक व सर्वसमावेशक असावी. भारतातील शिक्षणाचा आशय हा भारतीय संविधानाशी सुसंगत असलाच पाहिजे, असे विचार येथे मांडण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक व महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भुसारी यांनी केले. सूत्रसंचलन आदेश बोंबार्डे, वर्षा घटारे, श्रीराम काळे, हंसराज टेंभुर्णे यांनी केले. तर चंद्रशेखर बागडे यांनी ठराव वाचन केले.