विद्यार्थ्यांनी सामाजिकदृष्ट्या जागृत असावे – विनोद तावडे

0
18

मुंबई, दि. 20 : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना सामाजिकदृष्ट्या जागृत राहिल्यास करिअर सोबतच जीवनातही यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले. विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयात दि. 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय माध्यम कलोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी श्री. तावडे बोलत होते.
यावेळी आमदार ॲड पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, बी. एम. एम. विभागाचे प्रमुख गजेंद्र देवरा आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमती देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांचे चरित्र पुस्तक भेट देऊन श्री. तावडे यांचे स्वागत केले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजवाडे म्हणाले, शिक्षण मंत्री श्री. तावडे हे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल महाविद्यालयास अभिमान असल्याचे सांगत कौतुक केले.
श्री. तावडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले छंद जोपासत असताना त्यात प्रगती करा, अडथळे आले म्हणून आपली आवड, छंद बंद करु नयेत, यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. यासाठी शासनाने कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत 10 मार्क जास्तीचे देण्यात येतील. राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यास नोकरीत 5 टक्के आरक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यास थेट नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाकडे करिअर म्हणून बघण्‍यास मदत होणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी झाल्याने आपला व्यक्तीमत्व विकास होण्याबरोबरच आपले करिअर घडण्यासही मदत मिळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवा जागृत ठेवल्यास करिअर सोबत जीवनातही यशस्वी होऊ शकतो. येत्या काळात भारतच सर्वांत तरुण देश असून संपूर्ण जगाला मनुष्यबळ पुरवेल यासाठी जगाच्या गरजा आळखून मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विकास आभ्यासक्रमावर शासन भर देत आहे. पारंपरिक शिक्षणसोबतच शिक्षणाचा स्तर उंचाविण्यासाठी शासन कायमच प्रयत्नशिल असून महाराष्ट्र इंटरनॅशल एज्यूकेशन बोर्डाशी सरकारी शाळा जोडणे, चीनच्या धर्तीवर ओपन बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाना श्री. तावडे यांनी मनमोकळेपणी उत्तरे दिली. कलोत्सवातील विविध स्टॉललाही भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
००००