गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते किरसान यांचा जनसंपर्क सुरु

0
24

गडचिरोली/ब्रम्हपूरी,दि.21: येत्या २०१९ च्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच जनतेपर्यंत पोचून आपल्या उमेदवारीला बळकट करण्याचा मोहीमेत जनसंपर्क अभियानाला सुरवात केली आहे.अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातही प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.भाजपकडून सध्यातरी विद्ममान खासदार अशोक नेते यांच्याशिवाय दुसरा कुठला उमेदवार रिंगणात उतरविला जाईल याबाबत शंका आहे.त्यामुळे नेते यांना उमेदवारी मिळाली तर आधीच संपर्क असल्यामुळे त्रास जाणार नाही.मात्र या मतदारसंघात काँग्रेसमध्ये जोमात रस्सीखेच सुरु आहे.माजी खासदार मारोतराव कोवासे हे सध्या पराभवानंतर कुठेच चित्रात दिसून येत नाही.परंतु गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी नेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आदिवासी सेवक डॉŸ.नामदेवराव किरसान हे गेल्या निवडणुकीपासूनच या मतदारसंघावर नजर रोखून आहेत.पक्षाच्या आदेशानुसारच काम करण्याची त्यांची पध्दत असल्याने पक्ष आपल्याला न्याय देईल या भूमिकेतूनच त्यांनी या लोकसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क अभियान वाढविला आहे.गेल्या वर्षभरापासून ते या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कार्यक्रमात हजर असतात.जिल्ह्यातील आमगाव-देवरी मतदारसंघातील कार्यक्रमात ज्याप्रमाणे त्यांची हजेरी असते तशीच हजेरी,ब्रम्हपूरी,चिमूर, आरमोरी, गडचिरोली,अहेरी मतदारसंघातही दिसून येत आहे.गेल्या महिन्यात चिमूर व ब्रम्हपुरी तालुक्यात त्यांनी आमदार विजय वड्डेटीवारांसह, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर आदी अनेक कार्यकत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.सोबतच डॉ. नितीन कोडवते,माजी खासदार मारोतराव कोवासे, डॉ. नामदेव उसेंडी, सगुण क्लांडी यांनीही उमेदावरीसाठी फिल्डींग लावण्यास सुरवात केली आहे.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातून लोकसभेत पोहोचलेले भाजपाचे खासदार अशोक नेते यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघाच्या बहुतांश भागात जनसंपर्क ठेवून आपली पकड घट्ट केली आहे. यामुळेच भाजपामध्ये त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय समोर आलेला नाही. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावाचीही अधूनमधून चर्चा सुरु असते.पण त्यांच्याच मतदारसंघात त्यांना शोधण्याची वेळ येते.पालकमंत्री म्हणून तसेही अपयशी ठरलेले असल्याने त्यांचा पत्ता कट समजला जातो.
काँग्रेसमध्ये मात्र दिवसागणिक चुरस वाढत आहे. यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयाची संधी असल्याचे गृहीत धरुन इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडावते यांची नावे समोर केली जात आहे. माजी खासमदार मारोतराव कोवासे, सगुणा तलांडी यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. पक्षाने आदेश दिल्यास स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी ठेवणारे माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी काही दिवसापुर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण अद्याप निवृत्त झालेलो नाही हे दाखवून दिले.चिरंजीव विश्वजीत यांच्या राजकीय भवितव्याच्या हमीवर स्वत: माघार घेऊन डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नावाला ते पाठिंबा देऊ शकतात. सुरुवातीला विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉ. उसेंडी यांनी अलिकडे लोकसभेची ‘रिस्कङ्क घेणे फायद्याचे समजत तयारी सुरु केली आहे. गोंदिया जिलह्यातील आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त डॉ. नामदेव किरसान या माजी उत्पादन शुल्क आयुक्तांनी गेल्या पाच-सहा वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन पक्षबांधणीच्या कामात हातभार लावला आहे. यामुळे गडचिरोली-चिमुर मतदारसंघासाठी आपण योग्य पर्याय असल्याचे त्यांनीही पक्षश्रेष्ठींपुढे बिंबविले आहे.