उईकेंच्या निलंबनाविरोधात आदिवासी संघटनेचे शिक्षण सभापतींना निवेदन

0
13

गोंदिया,दि.22 : देवरी तालुक्यातील शिलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत साहाय्यक शिक्षकपदावर कार्यरत चेतन उईके हे कर्तव्यनिष्ठ शिक्षक आणि फावल्या वेळात समाजाच्या मूलभूत हक्कांकरिता झटणाऱ्या शिक्षकाला जिल्हा परिषद प्रशासनाने ५ डिसेंबर रोजी निलंबित केले.देवरी येथील समाजाच्या कार्यक्रमात आणि सालेकसा येथील शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात सहभाग तसेच बुट्टीबोरी येथील होलिक्रॉस कॉन्व्हेंटच्या अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी समाजाची बाजू मांडली होती. यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यामुळे समाजाची बाजू मांडणे गैर आहे का? असा सवाल उपस्थित करीत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींना निवेदन सादर करीत निलंबन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुटीच्या दिवशी सामाजिक काम करणे गैर नाही. मग एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे ओबीसी संघर्ष कृती समितीही त्यांच्या बचावाकरिता मैदानात उतरली आहे. निलंबनाच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात यावी. चेतन उईके या आदिवासी समाजसेवकाच्या निलंबनाकरिता गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि सीईओ यांच्याकडे अहवाल पाठविण्याकरिता कोणत्या नेत्याचा दबाव होता तसेच तसेच चेतन उईके यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या मागण्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.याच अनुषंगाने आता ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने निलंबन मागे घेण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उईके यांनी एससी, एसटी, ओबीसी यांच्या शिष्यवृत्तीचे प्रकरण तसेच वनहक्क जमिनीचे प्रकरण अनेक कार्यक्रमात मार्गी लावण्याचे आवाहन केले तसेच शिक्षण क्षेत्रातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतरही विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशी शैक्षणिक शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असत. परंतु हेतूपुरस्सर त्यांचे निलंबन करण्यात आले.निवेदन देताना नगरसेवक हेमंत पंधरे, करण टेकाम, अविरल सयाम, युवराज कोतहारे, एस.बी. मडावी, एस. के. मडावी, जी. एस. कुंभरे, एस.जी. राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते..