वनांचे व वन्यजीवांचे महत्व जनतेला पटवून द्यावे -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
26

सातारा, दि.23 : वृक्ष लागवड करणे व वनांचे संरक्षण करणे हे ईश्वरीय काम आहे, वनांचे व वन्यजीवांचे महत्व काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचले पाहीजे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने वनांबरोबर वन्यजीवांचे, त्यांच्या संरक्षणाचे महत्व पटवून सांगितले पाहिजे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

कोल्हापूर सह्याद्री राखीव व्याघ्र प्रकल्प उपसंचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री विजय शिवतारे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतूल भोसले, खासदार राजू शेट्टी, आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवाजीराव नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव एम. के. राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, नाशिकचे उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, उपसंचालक विनीता व्यास आदी उपस्थित होते.
शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे जमिनीची धूप थांबून सूपीकता, पावसाचे प्रमाण वाढणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. वृक्ष लागवडीमुळे शुध्द प्राण वायू, शुध्द विचार व आचार मिळण्यासह उत्साही नागरिक घडविण्यास मदत होणार आहे. वन क्षेत्रातील वन्य प्राण्यांकडून नुकसान झाले तर कायदेशीर मदत मिळावी, व नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत मिळावी यासाठी कायदा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वन विभागाने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना सुरु केली आहे, याचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करावे. वन क्षेत्रात होणारी कामे लोकप्रतिनिधी तसेच गावकऱ्यांना विश्वासात घेऊन करावी. ग्रीन आर्मीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने चांगला सहभाग नोंदविला आहे. यापूढेही नागरीकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदणी करावे. वन शास्त्र, पर्यावरण शास्त्र याला महत्व देणे आता काळाची गरज बनलीआहे. समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवून कमीत कमी एक झाड लावावे,असे आवाहन करुन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कार्यालय वन्यजीवांचे संवर्धन करेल, असा विश्वासही वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेल्या या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे. या व्याघ्र प्रकल्पाची इमारत अतिशय सुंदर आहे. हे कार्यालय वन्य जीव व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावेल. शासनाने जिल्ह्यात चांगली कामे केली असून ही कामे जनतेपर्यंत पोहोचली पाहीजेत. वनमंत्री हे सुधीर मुनगंटीवार हे संवेदनशील असून त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. यापूढेही ते असेच चांगले काम करत राहतील,असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के. राव यांनी केले. तर आभार विनीता व्यास यांनी मांडले. या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.