लोकबिरादरीच्या पुढाकाराने कोयनगुडा गाव झाले पाणीदार

0
19
गडचिरोली,दि.24ःः -जिल्ह्यातील जंगलव्याप्त आदिवासी भाग असलेल्या हेमलकसा येथे 45 वर्षापुर्वी २३ डिसेंबर १९७३ ला ‘लोकबिरादरी प्रकल्पाची’ मुहूर्तमेढ बाबा आमटे यांनी रोवली.त्या लोकबिरादरी प्रकल्पाला आपली कर्मभूमी मानत बाबांचा वारसा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या दांम्पत्यांनी चालविला आहे.या लोकबिरादरी प्रकल्पाचा ४५ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधून भामरागड तालुक्यातील सुमारे ३५० लोकसंख्या असलेले कोयनगुडा या गावातील पाण्याची समस्या लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन करुन सोडविण्यात आली आहे.कधीकाळी या गावातील महिलांना पाण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागत होती. आ्ता मात्र, लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून हे गाव पाणीदार झाले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, अनघा आमटे या आमटे कुटुंबातील सदस्यांसह तहसीलदार कैलास अंडील उपस्थित होते. लोक बिरादरी प्रकल्पातर्फे आत्तापर्यंत १५ गावात मोठ-मोठे तलाव बांधून झाले आहेत. २०१९ या वर्षात अजून किमान ५ गावात मोठे तलाव बांधण्याचे कार्य होणार आहे. हिदूर या गावापासून नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू होत आहे. यापूर्वीही जिंजगाव येथे मोठ्या तलावाचे खोलीकरण, नवीन विहिरीचे बांधकाम, ५० हजार लिटरची उंच पाण्याची टाकी आणि गावातील सर्व ९० घरांना घरपोच नळाने पाणी दिले आहे.