राफेल घोटाळ्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणार-कॉंग्रेस प्रवक्ते अतूल लोंढे 

0
13
गोंदिया,दि. २५: तत्कालीन कॉंग्रेसच्या केंद्रात असलेल्या सरकारने सर्व प्रक्रीया पूर्ण करून भारतीय सैन्याला लागणाऱ्या लढाऊ विमानाचा सौदा केला. १२६ विमान खरेदी करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक विमान ५२६ कोटी रुपयांना घेण्याचे ठरले. वर्क शेअर एग्रीमेंट भारत सरकारच्या हिंदूस्थान एअरोनॉटिकल या संस्थेशी करण्यात आला. परंतु, त्यानंतर भाजपचे सरकार केंद्रात आहे. या सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायंस या संस्थेला ते कंत्राट देवून रिलायंस उद्योग समुहाला लाभ पोहोचवून देण्याच्या उद्देशाने ५२६ कोटी कोटी रुपयांचा विमान १६७० कोटी रुपयांना खरेदी केले. १२६ विमान खरेदी करावयाचे असताना फक्त ३६ विमानांची खरेदी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला. कॉंग्रेसने न्यायालयात हे प्रकरण न नेता जेपीसीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु, भाजपने हे प्रकरण जेपीसीकडे न सोपविता भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न केला. अंबानी यांच्या ज्या कंपनीला वर्क शेअर पार्टनर म्हणून घेण्यात आले. त्या कंपनीला फायदा पोहोचविण्याकरिता १० रुपयांचा शेअर ११०० रुपयांना खरेदी करण्यात आला. सुरक्षा महत्वाची असल्यामुळे कॉंग्रसने राफेल विमानाच्या इतर बाबींबद्दल जाहीर चर्चा केली नाही. फक्त किमत का वाढविण्यात आली आणि हिंदूस्थान एअरोनॉटिकल या संस्थेला वगळून रिलायंस उद्योग समुहाला कंत्राट का देण्यात आले हा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यालयाने देखील हे प्रकरण सुरक्षेशी निगडीत असल्याने त्याची चौकशी कॅग आणि जेपीसी मार्फत करण्याच्या सुचना केल्या. मात्र, त्याचा विपर्यास करत केंद्रातील मोदी सरकार जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा प्रवक्ता अतूल लोंढे यांनी केला. येथील शहीद भोला भवनात राफेल विमानासंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते आज(दि. २५) बोलत होते. हे प्रकरण स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही त्यांनी म्हटले. हे सरकार नागरिकांची दिशाभूल करत आहे. येत्या काही महिन्यांत सत्ताबद्दल अटळ आहे. सत्ता आल्यानंतर जेपीसी मार्फत चौकशी करून हा घोटाळा उघड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रदेश प्रतिनिधी सहेषराम कोरेटे, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, आलोक मोहंती, अशोक चौधरी, सीमा मडावी, लता दोनोडे, अपूर्व अग्रवाल आदी उपस्थित होते.