दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत- राजकुमार बडोले

0
9

शहिद जान्या तिम्या जि.प.आंतरराष्ट्रीय शाळेचा लोकार्पण सोहळा
गोरेगाव,(दि.२५):येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्याथ्र्यांना दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचा आज लोकार्पण सोहळा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. यावेळी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, पं.स.सभापती माधुरी टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.हाश्मी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
.बडोले पुढे म्हणाले, राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये शहीद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव या शाळेचा समावेश आहे. ही गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदललेला असून शिक्षकांनी विद्याथ्र्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण दिले पाहिजे. या शाळेतील शिक्षण हे मराठी मातृभाषेतून होणार आहे. देशाला उत्तम योगदान देणारे विद्यार्थी या शाळेतून घडविण्यात यावे. या शाळेत भौतिक सुविधांचा अभाव असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्यात येईल, त्याकरीता प्रस्ताव पाठविण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
रहांगडाले म्हणाले, विद्याथ्र्यांना या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकांची मानसिकता असली पाहिजे. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण देवून चांगले विद्यार्थी घडवावेत असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून श्री.नरड म्हणाले, राज्यातील विद्याथ्र्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून राज्यातील १३ शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्याथ्याची गुणवत्ता सिद्ध करणारा हा शिक्षणक्रम तयार करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत राज्यातील १३ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने शुभारंभ झाला. त्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले.
कार्यक्रमास तिरोडा उपविभागीय अधिकारी जी.एम.तळपाडे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, उपशिक्षणाधिकारी श्री.मांढरे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे, पं.स.उपसभापती सुरेश रहांगडाले, जि.प.सदस्य पुष्पराज जनबंधू, माजी सभापती दिलीप चौधरी, रेखलाल टेंभरे, लक्ष्मण भगत, गोरेगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.चव्हाण यांचेसह गोरेगाव परिसरातील नागरिक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एम.बी.शेख यांनी केले, उपस्थितांचे आभार शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र बिसेन यांनी मानले.