तुमसरच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून लोकसभेची चाचपणी

0
19

भंडारा,दि.26ः-आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तुमसर येथे भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत संघटन बांधणी व बुथ कमिट्या मजबूत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ही तीन मोठी राज्ये गमविल्यानंतर भाजपकडून आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे यावरून दिसून येते.त्यातच बैठकिच्या ढिसाळ नियोजनाबद्दल भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारीने संबधितांना चांगलेच खडेबोल सुनावल्याच्या चर्चेनेही भाजपमध्ये वातावरण गरम झाले आहे.सध्या भाजपचा एक पदाधिकारी सामान्य कार्यकर्त्यांना चांगलाच झापत असल्याने नाराजीचा सुर दिसून येत आहे.यापुर्वी गोंदियातल्या एका दिवाळी मिलन समारोहात सुध्दा अशाच प्रकार झाल्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहेत.
माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला होता. त्यानंतर तीन राज्यात झालेला पराभव भाजपला अधिकच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पुढील लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रावर नजर ठेवून असून तेथील विधानसभा क्षेत्रातील आमदारांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या यशावर संबंधित क्षेत्राच्या आमदारकीचे तिकीट पक्की होणार आहे. त्यामुळे सर्वच आमदारांमध्ये धडकी भरली असून ते कामाला लागले आहेत.
याशिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजपच्या धोरणांवर जोरदार टिका केली जात आहे. राफेल घोटाळा, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, सिंचनाची समस्या आदी मुद्यांना हात घालत ते मतदारांजवळ जात आहेत. मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याच पार्श्‍वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी तुमसर येथील गभणे सभागृहात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. भाजप पदाधिकार्‍यांशिवाय त्यांचा हा दौरा गुपित ठेवण्यात आला होता. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.रमेश कुथे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणीक, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, भंडारा जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, लोकसभा क्षेत्र प्रभारी आ. गिरीश व्यास,विरेंद्र अंजनकर, आ.चरण वाघमारे, आ.राजेश काशीवार, आ.अँड. रामचंद्र अवसरे, आ.परीणय फुके, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे,माजी खासदार शिशुपाल पटले, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, तिरोड्याचे नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, साकोलीचे नगराध्यक्ष धनवंता राऊत,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य डॉ. युवराज जमईवार,इंजि.राजेंद्र पटले,राजेश पटले,विनोद अग्रवाल,सुनिल केलनका,चिंतामण रहागंडाले, आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दानवे यांनी प्रत्येक मंडळाचा संघटनात्मक आढावा घेतला. संघटन बांधणी मजबूत करा व बुथ कमिट्यांना सक्र ीय करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी भाजपच्या विविध आघाड्यांचाही आढावा घेतला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहोचवा. नेते येतील आणि जातील. पण, भाजपसाठी कार्यकर्ता मुख्य असल्याने कार्यकर्त्यांचे संघटन बांधणीवर जोर द्या, असेही त्यांनी सांगितले.
तथापि, चार वर्षाच्या कार्यकाळात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षापासून दूर झाल्याचे चित्र दोन्ही जिल्ह्यात आहे. उपाशी राहून कोणतीही लढाई जिंकता येत नाही त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांशिवाय कोणत्याही निवडणूका जिंकता येत नाही, हे लक्षात आल्यानेच पुन्हा कार्यकर्त्यांच्या संघटन बांधणीवर भाजप जोर देत आहे. त्यात त्यांना कितपत यश येते, हे पुढील निवडणुकीनंतर कळणार आहे.