१९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन ९ फेब्रुवारीला

0
7

चंद्रपूर,दि.27ः- १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन १२ व १३ जानेवारी २0१९ ऐवजी ९-१0 फेब्रुवारीला चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आधीच्या तारखेत बदल करण्यात आलेला असल्याचे एका पत्रकाव्दारे कळविण्यात आलेले आहे.
नवीन वर्षात आयोजित होणारे १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपुरात होत असून सदर संमेलन चंद्रपुरातील पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रात कार्य करणारी इको-प्रो संस्थेच्या यजमानपदाखाली होणार आहे. यासंदर्भात पूर्वी कळविण्यात आलेल्या तारखा १२-१३ जानेवारी मध्ये काही अपरिहार्य कारणास्तव बदल करण्यात येत असल्याचे इको-प्रो संस्थेच्या पक्षी संरक्षण विभाग व वन्यजीव संरक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. यासंदर्भात नुकतेच शहरातील संबधित पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थाच्या पदाधिकारी यांना भेटून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
इको-प्रो संस्था मागील १५ वर्षपासून पर्यावरण, वन्यजीव, सर्पसंरक्षण व पक्षिसंरक्षण आदी विषयासह अनेक क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करीत असून सदर पक्षिमित्र संमेलन यशस्वी करण्यास सर्वतोपरी प्रयत्नशिल आहे. तसेच महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे आजवर ३१ राज्यस्तरीय संमेलने राज्यात पार पडली असून २५ पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन पार पडले आहे, यामध्ये विदर्भ नेहमीच अग्रेसर राहिला असून यातील १९ वे संमेलन चंद्रपूर येथे आयोजित होत आहे. या संमेलनात विदर्भातील १५0-२00 प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित असून या दोन दिवस चालणार्‍या संमेलनात अभ्यासकांचे मार्गदर्शन व सादरीकरण सुध्दा होतील तसेच नवोदितांना सादरीकरणास सुध्दा संधी राहणार आहे.
निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणीका प्रकाशन, शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी काही स्पर्धा ई. कार्यक्रम या दरम्यान घेण्याचे ठरविले असल्याचे इको-प्रो संस्थेचे वन्यजीव विभाग प्रमुख नितीन बुरडकर व पक्षी विभागचे बंडु दुधे, हरीश मेर्शाम यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.