ओबीसींच्या मागण्यासांठी भंडार्यांत निघाला मोर्चा

0
13

भंडारा,दि.27ः- ओबीसींची जनगणना, घरकुल तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची असताना सरकारकडून जनगणना करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याशिवाय ओबीसींच्या घरकुलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना करण्यात यावी, घरकूलाचा प्रश्न मार्गी लागावा, शेतकर्‍यांना मोफत वीजपुरवठा देण्यात यावा, आरक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांना सवलती देण्यात यावी, टक्केवारीनुसार आरक्षण, जातीचे क्रिमिलिअरची अट रद्द करण्यात यावी, नोकरीतील रिक्त पदे भरण्यात यावी, मोफत एसटी प्रवास पास, टीसी व जन्म प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र मानण्यात यावे, जात पडताळणीचा गोरखधंदा बंद करण्यात यावा, परीक्षा शुल्क कायमचे बंद करण्यात यावे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सर्व जातीच्या मुलींना देण्यात यावी, सर्वविद्यार्थ्यांना गणवेश भत्ता तसेच मुलींना ५ रुपये उपस्थिती भत्ता देण्यात यावा, या व अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
जलाराम मंगल कार्यालयातून या मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात सहभागी झालेले ओबीसी बांधव, विद्यार्थ्यांनी न्याय हक्कासाठीच्या घोषणा दिल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय चौकात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उर्मिला आगाशे, के.झेड. शेंडे, भय्याजी लांबट, ईसापूरे, रतिराम हलमारे, शिशुपाल भूरे, दिनेश बालपांडे यांनी मोर्चाला संबोधित केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मोर्चामध्ये ओबीसी क्रांतीच्या मोर्चाचे मुख्य संयोजक संजय मते, सुकराम देशकर, जिल्हा महिलाध्यक्षा कुंदा वैद्य, बालू ठवकर, सुभाष आजबले, आनंद मेर्शाम, पुरुषोत्तम नंदूरकर, मंगेश वंजारी, शिशुपाल भूरे, अनिल कडव, यशवंत भोयर, अनिल कडव, शोभा बावनकर, देविदास लांजेवार यांच्यासह ओबीसी क्र ांती मोर्चाचे तालुका व शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.