बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ-जिल्हाधिकारी गोयल

0
8

भंडारा,दि.27ः- बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सांगितले.
कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, उमेद प्रकल्प व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ डिसेंबर दरम्यान दसरा मैदान शास्त्री चौक, भंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सव व सरस महिला बचत गट विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप २६ डिसेंबर रोजी झाला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, महिला बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य निळकंठ कायते, कारेमोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा मनिषा कुरसंगे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सतिश राजु व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कृषि व बचत गट एकमेकाला पूरक असून कृषि महोत्सवाच्या माध्यमातून दोन्ही वर्गाचे सक्षमीकरण व्हावे यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा व कृषि विभागाने एकत्रित हा महोत्सव आयोजित केला होता, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले. सेंद्रीय तांदुळाला मोठी मागणी या महोत्सवात मिळाली. पशुसंवर्धन विभागाच्या पशु प्रदर्शनीला शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला. बचत गटाच्या उत्पादनांना नागरिकांनी पसंती नोंदविली. त्यामुळे हा महोत्सव शेती व बचत गटांना व्यावसायिक दिशा देणारा ठरला, असे रविंद्र जगताप म्हणाले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हिंदुराव चव्हाण यांनी केले तर आभार मंजुषा ठवकर यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मूकुंद ठवकर यांनी केले.