रॉकेलचा काळाबाजार करणारे अटकेत;५१ लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त

0
14

गोंदिया,दि.29ः- शासकीय केरोसीनचा काळाबाजार करुन खासगी वाहनामध्ये केरोसीन भरताना केरोसीन दुकानदारासह दोन आरोपींना फुलचूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार, २८ डिसेंबर रोजी रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. संतोष गजानन खंगार, लक्ष्मण मंसाराम कावरे व दुकानदार शामकुमार रामकुमार गुप्ता अशी आरोपींची नावे असून या कारवाईत ५१ लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शामकुमार गुप्ता यांचे फुलचूर येथे गौरीशंकर अँड सन केरोसीन ठोक विक्रेता गोदामातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी उपलब्ध निळ्या केरोसीनचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे निरीक्षण अधिकारी निलेश देठे यांनी पंचासह जावून गोदामावर छापा टाकला. यावेळी संतोष खंगारकर व लक्ष्मण कावरे हे पाईपच्या सहायाने टँकरच्या डिझेल टाकीत निळे केरोसीन टाकत असल्याचे आढळले. तसेच गोदाम परिसरात उभ्या असलेल्या अन्य तीन टॅक्टरच्या डिझेल टाकीची तपासणी केली असता त्यामध्येही निळे केरोसीन मिळून आले. पोलिसांनी चार टँकरमधील ३५0 लीटर निळे केरोसीनसह ४ टँकर असा एकूण ५१ लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त केला असून तिनही आरोपींवर जिवनाश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गोंदिया ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल केला असून संतोष खंगारकर व लक्ष्मण कावरे यांना अटक केली आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, प्रमोद बघेले, पोलिस उपनिरीक्षक संदिप भोपळे, पोलिस कर्मचारी सुखदेव राऊत, गोपाल कापगते, भुवनलाल देशमुख, मधूकर कृपाण, विजय रहांगडाले, विनय शेंडे आदींनी केली. त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल व अप्पर पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले.