राफेलबाबत राहुल गांधींच्या खोट्या आरोपामुळे देशाच्या संरक्षणाला धोका- भाजपा प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक

0
9
गोंदिया,दि.29ः – राफेल विमानांच्या खरेदीबाबत निर्णय प्रक्रिया, किंमत आणि भारतीय ऑफसेट पार्टनर या तीनही मुद्द्यांबाबत गैरव्यवहार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी खोटारडे आरोप करून देशाच्या संरक्षणाला धोका निर्माण केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी २९ डिसेंबर रोजी शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, शहर अध्यक्ष सुनील केलनका, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल, नगरसेवक जितेंद्र पंचबुद्धे, धर्मेश अग्रवाल, बाबा बिसेन,प्रचारप्रमुख जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, राफेल विमानांच्या खरेदीमध्ये काँग्रेसच्या काळापेक्षा भाजपाच्या राजवटीत किंमत वाढली हा काँग्रेसचा आरोप खोटारडा व चुकीचा आहे. काँग्रेस जी किंमत सांगत आहे ती मूळ विमानाची आहे. त्या दृष्टीने मूळ विमानाची किंमत पाहिल्यास भाजपा सरकारने केलेल्या खरेदीच्या निर्णयात ही किंमत कमीच झाली आहे. मूळ विमानावर विविध शस्त्रास्त्रे आणि उपकरणे बसविल्यानंतर किंमत वाढते. तुलना करताना ती समपातळीवर करायला हवी. विमानांच्या किंमतीचा तपशील देण्यासाठी दबाव आणून काँग्रेस लढाऊ विमानातील शस्त्रास्त्रांचा तपशील उघड करण्यास भाग पाडत आहे. हे धोकादायक आहे. हवाईदलाने अशा रितीने लढाऊ विमानाच्या किंमतीचा तपशील उघड करण्यास संरक्षणाच्या कारणास्तव विरोध केला होता आणि तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे.
त्यांनी सांगितले की, देशाच्या संरक्षणासाठी राफेलसारख्या विमानांची गरज आहे. विशेषतः आपली शेजारी राष्ट्रे आधुनिक विमाने ताब्यात घेऊन ताकद वाढवत असताना भारताच्या रक्षणासाठी अशी विमाने तातडीने ताफ्यात हवीत. त्यासाठी हवाईदलाकडून वारंवार मागणी होत असल्याने मोदी सरकारने झटपट हालचाली करून हा निर्णय घेतला. राहुल गांधी या देशहिताच्या निर्णयाविरुद्ध खोटारडे आरोप करून विमाने ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत बाधा आणत आहेत. तसेच ते विमानांच्या किंमतीचा तपशील जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणून शत्रूचीच मदत करत आहेत. हा तपशील जाहीर झाला की, विमानात कोणती शस्त्रास्त्रे लावली आहेत, हे उघड होते. राजकीय स्वार्थासाठी खोटेनाटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी.
राहुल गांधी यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत, असे वाटते तर त्यांना कधीही न्यायालयात दाद मागता येते. ते तसे करत नाहीत. आणि न्यायालयाने दिलेला निकालही मान्य करत नाहीत. त्यांना फक्त संशय निर्माण करून राजकारण करायचे आहे, असाही टोला पाठक यांनी हाणला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थान एरोनॉटिक्सची राफेल बनविणाऱ्या कंपनीबरोबरची चर्चा अनेक वर्षे चालू राहिली व तोडगा निघाला नाही. हिंदुस्थान एरोनॉटिक्सला सुमारे पावणेतीन पट अधिक मनुष्यबळ लागते आणि ती कंपनी विमानांच्या गुणवत्तेची जबाबदारी घेत नाही, या दोन मुद्द्यांवर राफेलच्या कंपनीबरोबरच्या वाटाघाटी फिसकटल्या होत्या. पण त्यामुळे महत्त्वाची वर्षे वाया गेली, अशी माहिती पाठक यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, जी कंपनी विमाने पुरवणार त्यांना भारतीय ऑफसेट पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे. हा नियम काँग्रेस सरकारच्या काळातच झाला आहे. दसाँ कंपनीने राफेल विमानांच्या निर्मितीसाठी कोणकोणते ऑफसेट पार्टनर निवडले यामध्ये भारत सरकारची काहीही भूमिका नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. अंबानींना सरकारने कंत्राट दिले हा राहुल गांधी यांचा आरोप चुकीचा व दिशाभूल करणारा आहे.