गोंदिया/तिरोडा नगरपरिषदेचे कर्मचारी संपावर

0
15

गोंदिया/तिरोडा,दि.01 : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील ३६५ नगर परिषदेतील कर्मचारी आज, १ जानेवारी २०१९ पासून  गोंदिया व तिरोडा नगर परिषदेचे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने गोंदिया व तिरोडा नगर परिषदेचे कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान  काल 31 डिसेंबरला आपल्या मागण्यांना घेऊन संघर्ष समितीने १ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मात्र आंदोलनांतर्गत १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत कार्यालयांसमोर निर्देशन व धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २९, ३० व ३१ तारखेला कर्मचाºयांनी काळ््या फिती लावून काम केले. येथील नगर परिषदेतील कर्मचाºयांनी सोमवारी (दि.३१) गेट मिटींग घेऊन आंदोलन केले होते.

महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेद्वारे शासनास वारंवार निवेदन देऊन नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करणे व अनुकंपाधारकांना त्वरित नोकरी देणे अशा मागण्यांचे निवेदन देऊनही या मागण्यांकडे शासनाद्वारे सतत दुर्लक्ष केल्याने तसेच २०१७ मध्ये राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सर्व मागण्या मान्य करू असे सांगितले असले तरी आजपर्यंत या मागण्या मान्य न झाल्याने आजपासून राज्यातील ३६५ नगर परिषदेचे कर्मचारी संपावर जात आहेत. तिरोडा नगर परिषदेचे कर्मचारीही आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याने संपूर्ण नगर परिषदेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून तिरोडा नगर परिषदेच्या स्वास्थ विभागातील २० स्थायी कर्मचारी व १४ अस्थायी कर्मचारी तसेच आस्थापनेवरील २८ कर्मचारी असे एकूण ६२ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.