पंतप्रधान मोदी यांचे हस्ते 15 जानेवारीला वाशिम येथील शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजचे डिजीटल उद्घाटन

0
12
अमरावती,दि.02ः-महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी, समानता यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान 2.0 अंतर्गत नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय, वाशिम येथे सुरु करण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी 12 कोटी रुपयांचे अनुदान मंजुर केले आहे.  या महाविद्यालयाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान ना.श्री नरेंद्रजी मोदी यांचे शुभहस्ते डिजीटल लाँचिंग पद्धतीने दिनांक 15 जानेवारी, 2019 रोजी करण्यात येणार आहे.
रुसा अंतर्गत महाराष्ट्रात नंदुरबार व वाशिम या दोन ठिकाणी शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे.  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील वाशिम या ठिकाणी केंद्र शासनाने महाविद्यालय मंजुर केल्यामुळे अमरावती विद्यापीठासाठी ती एक मोठी उपलब्धी ठरली असून वाशिम जिल्ह्राच्या शैक्षणिक विकासासाठी महत्वाकांक्षी असा उपक्रम ठरणार आहे.
शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय यशस्वीपणे स्थापन होण्यासाठी त्यामध्ये आवश्यक असणारी जमीन, नियोजित महाविद्यालयीन इमारत बांधकाम, साधनसामग्री, फर्निचर खरेदी, प्रस्तावित महाविद्यालयाची प्रशासनिक संरचना, शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांचा आकृतीबंध, महाविद्यालयाकरीता भौतिक व आर्थिक बाबींची माहिती, महाविद्यालयीन इमारत व वसतीगृहाच्या बांधकामावरील खर्च, बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी आदी बाबींशी निगडीत प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, उच्चशिक्षण पुणे यांचे अध्यक्षतेखाली, राज्य प्रकल्प संचालनालयाचे सहसंचालक किंवा उपसंचालक व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचा समावेश असलेली एम.डी.सी. वाशिम समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान ना.श्री नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते दि. 15 जानेवारी, 2019 रोजी होणा­या शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय, वाशिमच्या डिजीटल लाँचिंग कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे.