पत्रकाराच्या घरावर वाळू तस्करांचा हल्ला

0
24

चिमूर,दि.02ः- येथील पत्रकार पिंटू जुमनाके यांच्या घरी कुणी नसतांना चिमुरातील वाळू तस्करांनीे घराचे कुलूप तोडून सामानाची नासधूस केली व टीव्ही संच फोडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार पिन्टू जुमनाके सोमवारी सकाळी चिमूरचे उपविभागीय अधिकारी भय्यासाहेब बेहेरे यांच्यासह बाम्हणी, मानेमोहाळी येथे जात असतांना दोन ट्रॅक्टर विनापरवाना वाळू भरून जात असल्याचे दिसले. उपविभागीय अधिकारी बेहेरे यांनी त्या दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करुन त्यांना जप्त केले. दरम्यान ट्रॅक्टर मालकाला याची माहिती मिळताच बबलू जाधव व त्याचा मित्र यांनी पत्रकार पिन्टू जुमनाके यांचे घर गाठले. घरी दाराचे कुलूप तोडून त्या दोघांनी घरातील सामान अस्ताव्यस्त करून टीव्ही संच फोडला.
या घटनेची माहिती जुमनाके यांना मिळताच त्यांनी चिमूर पोलिस ठाण्यात रवी जाधव, बबलू जाधव व त्याच्या मित्राविरूध्द तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारावर चिमूर पोलिसांनी तिघांवर कलम ४५५, ४२७ व कलम ३४ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. घटनेचा पुढील तपास चिमूरचे ठाणेदार प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. पत्रकार पिंटू जुमनाके यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा विविध संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.