प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत-मुख्यमंत्री

0
37

भंडारा/नांदेड, दि. 2 –गरीब व ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. अडचणी येतात त्याचा निपटारा झाला पाहिजे, त्यासाठी या लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांच्या आकांक्षा समजून घेवून त्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. घरकुलाच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती कुठलीही रॉयल्टी न घेता उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यानी सांगितले. घरकुल योजनेकरीता नकाशा मंजूर करण्यासाठी लागणारे शुल्क रद्द करण्यासाठी शासन पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद या कार्यक्रमातून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, दादा साहेब गायकवाड सबळीकरण योजनेंतर्गत पलॉट व पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भडारा जिल्हयातील प्रधानमंत्री आवास योजना(शहरी व ग्रामीण ), रमाई व शबरी घरकुल योजनेतील 22 लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होते.
घरकुल योजना राज्यातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचेपर्यंत चालूच राहणार आहे. या योजनेत यादीत नसलेल्या नागरिकांना सामावून घेण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती रॉयल्टी न घेता मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेद्वारे देशातील सर्वसामान्यांना स्वत:चे हक्काचे घर असावे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत आहे. राज्यात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करुन दिल्या जातील. प्रत्येक नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत योजना चालूच राहणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोक संवाद’ साधून जाणून घेतली. लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही लाईव्ह पाहता आला.
लोकसंवादच्या पहिल्या पर्वात राज्यातील नंदूरबार, वर्धा, ठाणे, सातारा, नांदेड, लातूर, अमरावती, नागपूर, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. तर ठाणे, लातूर, नाशिक व नागपूर या जिल्हयात लाभार्थ्यांच्या घरासमोरुन संवाद साधला गेला.

नांदेड मधील अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळ म्हणाल्या, कुडाचे घर असल्यामुळे इतर पाहुण्यांचे पक्के घर पाहून मुले वारंवार आपले घर चांगले का नाही, असा प्रश्न विचारत होती. घर नसल्यामुळे चांगले घर व्हावे, यासाठी मुले जोमाने अभ्यासाला लागली. त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घर मंजूर झाले आणि यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदाच थेट संवाद साधता आला असल्याची भावना व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील सुजाता दिगंबर सावंत यांनी रमाई आवास योजनेतून घर मिळाल्यामुळे मुले आनंदी असून ते आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आवर्जून आणत असल्याचे सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थ्यांशी त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व घराच्या सुंदर बांधकामाबद्दल लाभार्थ्यांचे कौतुक केले. या लाभार्थ्यांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी राज्य व केंद्र शासनामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या घरात भेट देण्याचे थेट निमंत्रणच मुख्यमंत्र्यांना दिले.

अन् ‘देवेंद्र’च्या रुपात देव धावून आला…

इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. मात्र, घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिला अन् ‘देवेंद्रच्या रुपात देव’ भेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे दिवस सुखरुप झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, पक्के घर बांधल्यामुळे आनंद झाला असून माझ्या मित्रांनी घरावर लावलेल्या कृ.पा. निकम या नावाच्या पाटीवर बदल करून‘देवेंद्र – मोदीजी कृ पा’ असा बोर्ड लावला असल्याचे सांगितले.