गोदिंया जिल्ह्यात 83 हजार 974 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ-ना.बडोले

0
28

मुंबई, दि. 2 (प्रतिनिधी) ः गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 83 हजार 974 शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या बँक कर्ज खात्यात तब्बल 229 कोटी 93 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे सात बारा कोरे झालेले आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयातील आपल्या दालनात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, एकट्या गोंदिया जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी तब्बल 87 हजार 276 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी 83 हजार 974 शेतकरी पात्र ठरले आणि त्यांच्या बँक कर्ज खात्यात 229 कोटी 93 लाख रूपये जमा करण्यात आले. उर्वरीत 3 हजार 302 शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्याही बँक कर्ज खात्यात रक्कम जमा करण्यात येईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले.

तसेच मुद्दल व व्याजासह दिड लाख रूपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना अर्थात वन टाईम सेटलमेंट योजनेची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम तातडीने भरावी असे आवाहनही त्यांनी केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी कोणतीही अंतिम मुदत नसून शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी ग्वाहीही बडोले यांनी दिली.28 जून 2017 रोजी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची 9 मे 2018 मध्ये व्याप्ती वाढवून त्यात 2008-09 मध्ये कर्ज माफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात करण्यात आला. एवढेच नाही तर 1 एप्रिल ते 31 मार्च 2016 या कालावधीत वाटप केलेल्या पिक कर्ज आणि इमु पालन, पॉली हाऊस व शेडनेटच्या मध्यम मुदती कर्जाचाही समावेश केला. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळाला, हा संकटात असलेल्या शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा आहे, असेही बडोले यावेळी म्हणाले.