भूशास्त्र विभागातील सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने प्रो.विजयकुमार सन्मानित

0
18

नांदेड,दि.०२ः- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातील प्रोफेसर विजयकुमार यांना इंडियन नॅशनल सायन्स अॅकाडमी (आयएनएसए) तर्फे २०१८ चा भूशास्त्र विज्ञानामध्ये सर्वोत्कृष्ट संशोधन आणि अध्यापनामध्ये योगदान दिल्याबद्दल सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच दि.२८ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार त्यांना इंसाचे अध्यक्ष प्रो.ए.के. सूड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भारत सरकारच्या उच्च विज्ञान प्रशासनामधील इंडियन नॅशनल सायन्स अॅकाडमी (आयएनएसए) ही एक अग्रगण्य संस्था आहे. दरवर्षी विज्ञानामध्ये एकूण १२ शाखेसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. २०१८ मधील भूशास्त्र विभागातील हा पुरस्कार प्रो.विजयकुमार यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रु.५०,०००/-चा धनादेश आणि पुस्तके खरेदीसाठी रु.२०,०००/- वेगळे यासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.

हा पुरस्कार संपूर्ण देशामधून त्या-त्या विज्ञान क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केल्याबद्दल दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीस मिळतो. महाराष्ट्रातील प्रो.विजयकुमार हे एकमेव शिक्षक आहेत. ज्यांना हा पुरस्कार मिळाला. यापूर्वीही २०११ मध्ये भारत सरकारच्या नॅशनल जिओ सायन्स तर्फे त्यांना सन्मानित केले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही त्यांना २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते.

प्रो.विजयकुमार यांच्या या भरीव योगदानाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. त्याच बरोबर कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, डॉ.एस.के.जी.कृष्णामाचार्युलू, डॉ.डी.बी.पानसकर, डॉ.अर्जुन भोसले, डॉ.के.विजयकुमार, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम, डॉ.योगेश लोलगे, डॉ.अविनाश कदम यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.