घरकुलांच्या कामांना प्राधान्य द्यावे- पीयूष सिंह

0
30
????????????????????????????????????

वाशिम, दि. ०३ : जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजनांच्या कामांना संबंधित यंत्रणांनी प्राधान्य दयावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात घरकुल योजनांचा आढावा घेतांना श्री. सिंह बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, डॉ. शरद जावळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, जी घरकुले मंजूर आहेत त्यांची कामे तातडीने पूर्ण करा. प्रत्येक घरकुल योजनेची कामे करतांना लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेवून त्यांना सहाकार्य करावे. शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलांची कामे वेळेत पुर्ण होतील याकडे विशेष लक्ष दयावे. शहरी भागात घरकुलांच्या जागेची मोजणी करावी. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या कागदपत्रांची छाननी करुन त्रृटी दूर कराव्यात. ग्रामीण भागातील घरकुलांची कामे सुध्दा वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. घरकुलाच्या बांधकामासाठी रेती उपलब्धतेबाबत काही अडचणी आहेत काय तसेच उपलब्ध होणारी रेती कोठून आणली जाते याबाबतची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.

जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी सांगीतले की, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश  दिले असून येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे सुचविले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५५६२ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले असून त्यापैकी ३४६१ घरकुलांची कामे पुर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. रमाई घरकुल योजनेत ५१६६ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले असून ८९४ घरकुले पुर्ण झाली तर उर्वरित कामे सुरु आहे. शबरी घरकुल योजनेअंतर्गत २३२ घरकुलांचे उदिष्ट दिले असता १३७ घरकुल पूर्ण झाली तर पारधी आवास योजनेअंतर्गत ४५ पैकी २७ घरकुलांची कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. कापडे यांनी दिली.

शहरी भागात शासकीय जमीनीवरील अतिक्रमण धारकांची संख्या १०२३९ असून त्यापैकी ३०४४ अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अर्ज केले आहे. यामध्ये ११८५ अतिक्रमणधारक पात्र ठरले आहे. त्यापैकी १४१ अतिक्रमणधारक विकास आराखडयानुसार निवासी क्षेत्रात मोडत असल्याचे नगरपालीका प्रशासन अधिकारी श्री. मोरे यांनी यावेळी सांगीतले. या बैठकीला सर्व तहसिलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.