न्यायालयात रंगले काव्यवाचन

0
28

मराठीचा दैनंदिन वापर वाढवा – न्या. शिंदे

वाशिम, दि. ०३ :  जगातील बहुतांश भाषेचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेचा दैनंदिन वापर करण्यासोबतच बोलीभाषेचा वापर देखील वाढला पाहिजे, असे मत न्या. एस. पी. शिंदे यांनी व्यक्त केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात ३ जानेवारी रोजी काव्यवाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्या. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. एस. के. उंडाळ तर काव्य वाचनात डॉ. विजय काळे, चाफेश्वर गांगवे व उमेश बोरचाटे सहभागी झाले.

अॅड. उंडाळ म्हणाले, आज मराठी भाषेची मराठी शाळेमध्ये ग्रामीण भागात दयनीय अवस्था झाली आहे. कमी मुले मराठी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे मराठीची दयनीय अवस्था झाली आहे. मराठीच्या दयनीय अवस्थेस आपणच जबाबदार आहोत. आज न्यायालयात मराठी भाषेचा वापर होत आहे, ही मराठी भाषेच्या भरभराटीच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.आपल्या काव्य वाचनात ‘भाकरीचा मेळ’ ही कविता सादर करताना डॉ. काळे म्हणाले, ‘तू स्वप्नांना बळ दे, मी संसाराला ढिगळे लावतो, जमलंच तर संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. तू वाचत रहा पोथी पुराण, सत्यनारायणाची पूजा कर, अजून थोडा धीर धर, अजून थोडी वाट पहा, मी बजारात पोटासाठी डोंबाऱ्याचा खेळ लावतो, जमलंच संध्याकाळच्या भाकरीचा मेळ लावतो. लोक खुशाल जगतात कॉम्प्युटर इंटरनेट अन व्हॉटसअपच्या युगात, त्यांना अजून पटत नाही, भाकरीचा आमचा प्रश्न अजून सुटत नाही.’ कॅटरीना ही कविता सादर करताना श्री. गांगवे म्हणाले, ‘काल माया घरी कॅटरीना आली, कशी इचारते मंग तवा, कुठं हाय चाफेश्वर गांगवेची खोली, दोस्तान माया तिले व्हरांड्यात बसवलं.’

डॉ. काळे आपल्या ‘प्रेम’ या कवितेतून प्रेमाबाबतच्या भावना व्यक्त करताना म्हणाले, ‘काय सांगू तुला दोस्ता, प्रेम खरच काय असतं, कुणासाठी जगणं असतं कुणासाठी मरणं असतं, रात्रंदिवस कुणासाठी मनामध्ये झुरणं असतं. उमेश बोरचाटे आपल्या कवितेतून म्हणतात, हरणीसारखे डोळे तुझे, गुलाबासारखे ओठ, काय सांगू लोकांना तुझी बाजू गोड, तुझ्या घरी चार नोकर, माझ्या घरी चूल, तू शिक्षकाची मुलगी, मी शेतकऱ्याचा मुल. कवींनी सादर केलेल्या या कवितांना उपस्थित स्त्रोत्यांनी टाळ्यांचा तर कधी हास्याचा प्रतिसाद देत उत्तम दाद दिली. यावेळी अॅड. मोरे यांनी देखील कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार अॅड. ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाल न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.