विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी घेतला सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

0
9
????????????????????????????????????

वाशिम, दि. ०4 :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीचा आज विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आढावा घेतला. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत झालेली नवीन मतदारांची नोंद तसेच वगळण्यात आलेले मतदार याविषयाचा सुद्धा याबैठकीत आढावा घेण्यात आला.बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, धनंजय गोगटे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारीच्या दृष्टीने तहसीलदारांनी सर्व मतदान केंद्रनिहाय आढावा घेवून आवश्यक सोयी-सुविधांची माहिती घ्यावी. तसेच मतदान केंद्रांच्या संख्येनुसार मनुष्यबळ, वाहन व्यवस्था याची आवश्यकता व प्रत्यक्ष उपलब्धता याची पडताळणी करावी. मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टीने मयत मतदारांची नावे वगळणे आवश्यक आहे. याकरिता सर्व नगरपरिषद, नगरपंचायती व ग्रामपंचायातींकडे असलेल्या मृत्युच्या नोंदीनुसार मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा – पीयूष सिंह

आगामी लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होणार आहे. या दोन्ही यंत्रांच्या वापराविषयीची माहिती जास्तीत जास्त नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे याविषयीची जनजागृती मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. तसेच या मोहिमेदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या मतदान प्रात्यक्षिकादरम्यान नागरिकांनी काही शंका उपस्थित केल्यास संबधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना योग्य व स्पष्ट माहिती देवून त्यांच्या मनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी असलेले सर्व गैरसमज दूर करावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.