स्वच्छता ही लोक चळवळ व्हावी- सभापती हत्तीमारे

0
11

सडक अर्जुनी,दि.04- स्वच्छता ही प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याचे दुष्परिणाम आजघडीला जाणवत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता विषयक लोकचळवळ निर्माण व्हावी, असे प्रतिपादन सडक अर्जुनी पंचायत समितीचे सभापती गिरीधर हत्तीमारे यांनी केले. सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभागृहात आज 4 जानेवारी रोजी आयोजित तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहायक गट विकास अधिकारी तुरकर, जिल्हा परिषदेचे शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद्र रहांगडाले, कृषी अधिकारी डी. जे. कापगते, प्रा. राजकुमार भगत, शिक्षण विस्तार अधिकारी कोवे, विस्तार अधिकारी पंचायत खुणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद्र रहांगडाले यांनी स्पर्धेच्या आयोजनाची आवश्‍यकता काय आहे व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून काय करावे यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. सहायक गट विकास अधिकारी तुरकर यांनी विद्यार्थी यांनी स्वच्छतेचे दूत बनून कार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कृषी अधिकारी कापगते, विस्तार अधिकारी खुणे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी परीक्षक म्हणून ए. पी. मेश्राम, प्रा. राजकुमार भगत, टी. एम. राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सहायक कटरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता विभागाचे गटसमन्वयक राधेश्याम राऊत, भुमेश्वर साखरे यांनी प्रयत्न केले.