तुमसरात युवकाचा निर्घृण खून

0
11

तुमसर,दि.06ः-सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह करणार्‍या एका युवकाचा गळा कापून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी येथील हुतात्मा स्मारकाजवळ उघडकीस आली. साहिल ललीत शेंद्रे (२४) रा. सरदार नगर (पंधरा खोली) तुमसर असे मृतकाचे नाव आहे. त्याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत.याप्रकरणी तुमसर पोलिसांनी भादंविच्या कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक संदीपान उबाळे करीत आहेत.
शनिवारी सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना हुतात्मा स्मारकाजवळ साहिलचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा चिरलेला होता. शरिरावर काही खूणा होत्या. अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. साहिल हा तुमसर नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर त्याला नोकरी मिळाली होती. सहा महिन्यापूर्वीच त्याने प्रेमविवाह केला होता, हे विशेष. त्यामुळे तो लग्नानंतर कुटुंबासह वेगळा राहत होता.
साहिलचा खून करण्यामागील कारण काय? याचा शोध तुमसर पोलिस घेत आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्र म साळी, तुमसरचे ठाणेदार मनोज सिडाम, भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. भंडारा येथून श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी भाजी कापण्याचा चाकू आढळून आला. साहिलची शरिरयष्टी चांगली असल्याने त्याला मारण्यासाठी तीन ते चार जणांचा सहभाग असावा, अशी शक्यता आहे. साहिलच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा शनिवारी पहाटे ५ वाजता घरून कामावर जाण्यास निघाला होता. साहिलचा खून संशयास्पद असून, शहराबाहेर असलेल्या हुतात्मा स्मारकात पहाटे गेला कसा, याचा शोध घेतला जात आहे.