भरधाव ट्रकची एसटी बसला धडक;अदानी विद्युत प्रकल्पाजवळील घटना

0
6
तिरोडा,दि.08 : गोंदियावरून प्रवाशांना घेवून निघालेली गोंदिया – गंगाझरी – तिरोडा बस क्र.एमएच ४०/एक्यू ६०९० अदानी विद्युत प्रकल्पाजवळ येताच मागून येणार्‍या भरधाव ट्रक क्र. एमएच २६/एच ७१२० च्या चालकाने बसला जबर धडक दिली. धडक ऐवढी जोरदार होती, की ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रकचालक जखमी झाला आहे. ही घटना  (दि.७) दुपारी २.३० वाजतादरम्यान घडली. विशेष म्हणजे, अपघातानंतर अदानी विद्युत प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षकांनी एसटी बसमधील प्रवासी तसेच ट्रकचालकाला काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गोंदिया – तिरोडा मार्गावर विद्युत प्रकल्प आल्यापासून वाहतुकीच्या संख्येत वाढही झाली आहे. त्यातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आज ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार पती-पत्नी ठार झाले होते. त्यातच  (दि.७) गोंदियावरून प्रवाशांना घेऊन निघालेली गोंदिया – गंगाझरी – तिरोडा बस अदानी विद्युत प्रकल्पाजवळील गुमाधावडा गावाजवळ येताच मागेहून येणार्‍या ट्रकचालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने तो ट्रक एसटी बसला जाऊन आदळला. बसचालकाने बसवर नियंत्रण मिळविल्याने एसटी बस घटनास्थळापासून ७० मीटर अंतरावर जाऊन थांबली. विशेष म्हणजे, बसमध्ये मागच्या बाजूला प्रवासी बसले नव्हते. तसेच प्रवाशांची संख्या कमी होती. सुदैवाने बसमधील एकही प्रवासी जखमी झाला नाही. सर्व प्रवाशांना विद्युत प्रकल्पातील सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. मात्र, अनियंत्रित झालेला ट्रक पलटल्याने ट्रकचालक जखमी झाला. त्यालाही बाहेर काढून सुरक्षा रक्षकांनी उपचारासाठी तिरोडा रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी माहिती पोलिसांना दिली. मात्र, घटनेच्या तासभरानंतर पोलिस आल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर उपस्थित जनसमुदायाने संताप व्यक्त केला. घटनेची नोंद तिरोडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.