‘आत्मा’कडून पशुपालकांची कार्यशाळा उत्साहात

0
12

वाशिम, दि. ०8 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्था, अकोला व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग यांच्यासंयुक्त विद्यमाने देशी गाईचे शास्त्रोक्त संगोपन या विषयावर पशुपालकांकरिता नियोजन भवन येथे ७ जानेवारी २०१९ रोजी शेतकरी प्रशिक्षण तथा एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक आत्मा दत्तात्रय गावसाने हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था अकोला येथील शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बिराडे, डॉ. चैतन्य पावशे, प्रा. डॉ. सुनील वानखेडे, डॉ. महेश इंगवले, प्रा. डॉ. गिरीश पंचभाई, पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. खाजवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. इर्शाद खान, वंदे गो मातरम शेतकरी गटाचे अध्यक्ष रवींद्र मारशेटवार हे उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्री. गावसाने यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व शासनाच्या माध्यमातून कृषी पालकांसाठी काय करता येईल, याबाबत शेतकऱ्यांशी हितगुज करून त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. वानखेडे यांनी पशु आहाराविषयी, तर डॉ. पंचभाई यांनी कृषी उत्पादनाविषयी मार्गदर्शन, डॉ. इंगवले यांनी पशु जनन विषयक तर डॉ. पावशे यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. बिराडे यांनी पशुपालकांच्या विविध समस्यांना उत्तरे दिली. डॉ. खाजवणे यांनी शासनाच्या पशुधन विषयक विविध योजनांची माहिती दिली. डॉ. सुनील वाघमारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गोपालक शेतकरी रवींद्र मारशेटवार यांनी मानले.