वाचन संकृती वाढली पाहिजे-प्रा. डॉ. किरण वाघमारे

0
24
  • जिल्हा न्यायालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’

वाशिम, दि. ०8 :  मराठी भाषा टिकण्यासाठी, ती अधिकाधिक विकसित होण्यासाठी मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. याकरिता आजच्या तरुण पिढीमध्ये वाचन संकृती वाढली पाहिजे. आज नव्या माध्यमांमुळे वाचन सोपे झाले आहे. अनेक मराठी ग्रंथ या माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचे वाचन करून त्यावर संवाद होणे गरजेचे आहे. तरच मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे मत प्रा. डॉ.  किरण वाघमारे यांनी व्यक्त केले.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाच्यावतीने जिल्हा न्यायालयामध्ये ७ जानेवारी रोजी आयोजित ‘वाचन संकृती आणि आपण’ या विषयावर डॉ. वाघमारे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. एस. के. मालस उपस्थित होते.

प्रा. डॉ. वाघमारे म्हणाले, मराठी भाषेचा इतिहास अतिशय संपन्न आहे. ही भाषा मातीतून जन्माला आली असून ती सर्वत्र रुजली आहे. त्यामुळे अनेक परकीय आक्रमणे होवूनही मराठीचे अस्तित्व कायम आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये रुजलेली ही भाषा भविष्यातही जिवंत राहील. मात्र ही भाषा अधिक विकसित होण्यासाठी इतर बोलीभाषांना सामावून घेत ही भाषा समृद्ध करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे इंग्रजी भाषेमध्ये विविध शब्द संग्रहांची भर टाकली जाते, त्याचप्रमाणे मराठी भाषेचा शब्द संग्रह वाढविण्याची गरज आहे. हे काम कोणी एकटा-दुकटा व्यक्त करू शकणार नाही, सर्वांनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मराठी साहित्याचे जास्तीत जास्त वाचन व्हावे, मराठीतून लिहणारे साहित्यिक, कवी निर्माण व्हावेत, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन झाले पाहिजे. तसेच प्रत्येकाने मराठीला नेहमी प्राधान्य देवून या भाषेचा वापर वाढविला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

न्या. श्रीमती डॉ. मुसळे म्हणाल्या, मराठी भाषेला अनेक पैलू आहेत. वेगवेगळ्या प्रांतात या भाषेत वेगवेगळ्या शब्दांचा वापर होतो. हे प्रत्येक शब्द आपण समजून घेतले पाहिजेत. प्रत्येकाने स्वतःला वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. ग्रंथ वाचनाने व्यावहारिक ज्ञान मिळते. कोणत्याही प्रकारचे वाचन हे आपले ज्ञान वाढविणारेच असते. वाचनासोबतच आपण मराठी भाषेतून संवाद साधण्यावरही भर दिला पाहिजे. संवाद हा भाषा संवर्धनाचा महत्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला न्या. एस. बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. एस. पी. बुंदे, न्या. पी. एच. नेरकर, न्या. एम. एस. पोळ, न्या. एस. पी. वानखडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, कोषाध्यक्ष ॲड. श्रध्दा अग्रवाल यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार,न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. पी. पी. अंभोरे यांनी मानले.