शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पाडावा-वर्षा पटेल

0
18

गोंदिया,दि.10 : शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे विद्यार्थी व युवकांच्या विकासासाठी आवश्यक आहे. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समोर वाढण्याची प्रवृत्ती निर्माण होत असून काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांना एक आदर्श रूपात पाहून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करीत असतात. तेव्हा शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची गरज आहे. समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचेसुद्धा एक विशिष्ट स्थान असून समाजहितामध्ये कार्य करण्याचाही सन्मान होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांनी केले. .

त्या रावणवाडी येथील जी.ई.एस.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार समारोहात बोलत होत्या. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन वर्षा पटेल यांच्या हस्ते माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गेंदलाल शरणागत, विनोद पटले, गणेश बरडे, खुशबू टेंभरे माधुरी हरिणखेडे, राजकुमार एन.जैन, भीमलाल बिसेन, चंदन पटले, महेश हरिणखेडे, अशोक मेंढे, एस.एस.पठाण, प्रेमलाल हरिणखेडे, आनंद लांजेवार, अरिवंद हरिणखेडे उपस्थित होते. यावेळी विविध समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुजित येवले, यशवंत गेडाम, सरीता गौतम, नरेंद्र चिखलोंढे, यशवंत मेश्राम, डिलेश्वरी येळे, मंगल मस्करे यांचा गोंदिया शिक्षण संस्थेकडून सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या..