मुख्य बातम्या:

संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान शेतकरी विधवेला

यवतमाळ,दि.10 : यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान कळंब तालुक्‍यातील राजूर येथील शेतकऱ्याची विधवा वैशाली येडे यांना देण्यात आला आहे. याची घोषणा संमेलनाचे आयोजक रमाकांत कोलते यांनी गुरुवारी (दि.10) यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत केली. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या विधवेला उद्‌घाटनाची संधी संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे.
यवतमाळ हा भाग दुष्काळग्रस्त भाग आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करावे, असा प्रस्ताव आयोजकांनी महामंडळापुढे ठेवला. हा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत एकमताने मंजूर केला, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर यांनी दिली.
महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला तो आम्ही महामंडळाने स्वीकारला आहे, विदर्भ साहित्य संघाकडून तिसऱ्या सदस्याचे नाव सुचवले जात नाही तोपर्यंत घटनेच्या नियमाप्रमाणे अध्यक्षाचा पदभार उपाध्यक्षांनी सांभाळायचा असतो, त्याप्रमाणे मी सूत्रे हाती घेतली, असे विद्या देवधर यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ लेखिका डॉ. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेण्याबाबत आयोजक तसेच महामंडळानेही दिलगिरी व्यक्त केली. महामंडळाच्या प्रत्येक सदस्याने या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देवधर यांनी दिली. संमेलनाच्या व्यासपीठावर श्रीपाद जोशी उपस्थित राहणार नाही. संमेलनाला उपस्थित राहायचे आणि स्वतःची भूमिका मांडायची हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल याबाबत महामंडळाचा कोणताही संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका देवधर यांनी मांडली.

दरम्यान, यवतमाळमध्ये 11 ते 13 जानेवारीदरम्यान 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला, या घडामोडींमुळे यंदाचे साहित्य संमेलन रंजक होण्याची शक्यता आहे.

Share